पुणे | 24 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात बाहेरगावावरुन आलेले अनेक विद्यार्थी आणि नोकरी करणारे युवक-युवती आले आहेत. या सर्वांमध्ये स्विगी आणि झोमॅटो चांगलेच लोकप्रिय झाले आहे. विविध पदार्थांची ऑर्डर बुक करुन घरात पार्सल मागवून जेवण अनेक जण करतात. तसेच रिक्षा चालकांची वाट बघण्यापेक्षा आपल्या मोबाइलने ओला, उबेर बुक करणारे अनेक पुणेकर आहेत. या सर्वांची आता अडचण होणार आहे. कारण २५ ऑक्टोबर रोजी त्यांना झोमॅटो आणि स्विगीवरुन मागवलेले जेवण मिळणार नाही अन् ओलो, उबेरची सेवाही मिळणार आहे. या सर्वांनी बंद पुकारला आहे.
ओला, उबेर, स्विगी, झोमॅटो यासारख्या कंपन्यांसाठी काम करणारे कॅब आणि रिक्षा चालक आणि पुणे शहरातील झोमॅटो आणि स्विगीची डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. २५ ऑक्टोबर रोजी हा बंप पुकारण्यात आला आहे. राजस्थानमधील कामगार संरक्षण कायद्याप्रमाणे महाराष्ट्रात कायदा करण्याच्या मागणीसाठी बंद करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी लाभ देण्यासाठी कायदा हवा आहे.
राजस्थान सरकारने कामगारांसाठी कायदा केला आहे. या पद्धतीने कायदा करणारे राजस्थान हे भारतातील पहिले राज्य आहे. राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रात कायदा करण्याची मागणी ओला, उबेर आणि झोमॅटो स्वीगमधील कर्मचाऱ्यांनी केली आहे. यासाठी संप पुकारला असल्याचे अॅड केशव क्षीरसागर यांनी म्हटले आहे. कामगार वर्गाला महत्त्वाची सामाजिक सुरक्षा आणि अत्यावश्यक फायदे देणे हा या राजस्थानमध्ये तयार करण्यात आलेल्या कायद्याचा उद्देश आहे. या कायद्यात या कामगारांसाठी गिग वर्कर फंड (Gig Workers Fund and Welfare Fee) उभारण्याची योजना असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
ओला-उबेरविरोधात रिक्षा संघटनांनी उद्या आंदोलन पुकारले आहे. ओला-उबेरकडून रिक्षा आणि कॅब चालकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करत बुधवारी आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय ऑटो टॅक्सी बस ट्रन्सपोर्ट फेडरेशनचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी ही माहिती दिली. या आंदोलनात अनेक रिक्षा चालक सहभागी होणार आहेत.