पुणे : पुण्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप पाहायला मिळतोय (Pune Corona Updates). थोड्याशा विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा कोरोनाने उसळी घेतली आहे. दररोज हजारच्या वरती रुग्णसंख्या मिळत असल्याने पुण्यात लॉकडाऊनच्या चर्चा सुरु आहेत. अशावेळी पुण्यात कडक निर्बंध लावा मात्र लॉकडाऊन नको, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. (Pune Traders Association Wrote A letter To Ajit pawar over Pune Lockdown Corona Update)
गेल्या वर्षभर कोरोनाने सगळ्यांनाच हैरान केलंय. त्यातही पुण्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रुादुर्भाव पाहायला मिळाला. अगदी महाराष्ट्रातले सर्वाधिक कोरोना रुग्ण पुण्यात मिळाले. याच पार्श्वभूमीवर पुण्यात अतिशय कडक निर्बंध लादले गेले. कित्येक व्यापाऱ्यांची दुकाने पाच ते सहा महिने बंद होती. आता कुठे व्यवसाय पुन्हा रुळावर येतो ना येतो तोच पुन्हा एकदा कोरोनाने उसळी घ्यायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावले तरी चालतील पण आता लॉकडाऊन नको, अशी विनंती पुणे व्यापारी महासंघाने अजित पवार यांच्याकडे केली आहे.
पुणे व्यापारी महासंघाने अजित पवार यांना यासंदर्भातलं एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये आपली व्यथा मांडत गेल्या वर्षभरातले व्यापाऱ्यांचे हाल त्यांनी पत्राच्या माध्यमातून अजित पवारांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच दुकाने बंद असल्याने कोरोना प्रादुर्भावाच्या काळात व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं सांगत आता पुन्हा आमच्यावर लॉकडाऊनचा घाव घालू नका, अशी विनंती महासंघाने केली आहे.
“कोरोनामुळे पुण्यातील व्यवसाय सुमारे सात ते आठ महिने बंद होते. त्यामुळे व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता कुठे व्यवसायाला सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत पुन्हा लॉकडाऊन झाल्यास व्यापार्यांचे प्रचंड मोठे नुकसान होईल. त्यामुळे पुण्यात हवं तर कडक निर्बंध लावा मात्र लॉकडाऊन नको”, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी पत्रातून मांडली आहे.
पुण्यात कोरोनाने पुन्हा एकदा वर डोके काढले आहे. तीन ते चार महिने थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर शहरांत कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यापासून हा आकडा दररोज वाढतो आहे अर्थात कोरोनाबाधितांचा वाढता आलेख पाहायला मिळत आहे.
पुणे शहरात गुरुवारी नव्याने 1 हजार 504 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्याअगोदर बुधवारी पुण्यात 1 हजार 352 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर मंगळवारी 1 हजार 86 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.
यावरुन गेल्या तीन दिवसांत पुण्यात कोरोना किती वेगाने फोफावतोय, हे कळायला मदत होतीय. दुसरीकडे रुग्णसंख्या वाढत असताना पुण्यात पुन्हा एकदा टेस्टिंगची संख्यादेखील वाढवली आहे. तसंच लसीकरणाने देखील जोर धरला आहे.
(Pune Traders Association Wrote A letter To Ajit pawar over Pune Lockdown Corona Update)
हे ही वाचा :
Corona Update | कोरोना फोफावतोय, जळगावात शुक्रवार ते रविवार जनता कर्फ्यू, औरंगाबादेत रस्ते ओसाड