विनय जगताप, भोर, पुणे | 21 सप्टेंबर 2023 : पुणे शहराजवळ असलेल्या वरंध घाटातील रस्ता बिकट आहे. राज्यमार्गावर महाडकडून भोरमार्गे पुणे शहराकडे जाताना वरंध घाट लागतो. हा घाट तब्बल २० किलोमीटर लांबीचा आहे. घाटचा रस्ता बिकट असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात ठराविक कालावधीसाठी बंद ठेवला जातो. जड वाहनांसाठी 30 सप्टेंबरपर्यंत तर हलक्या वाहनांसाठी पावसाचा अलर्ट असताना हा घाट बंद असतो. या घाटात गुरुवारी पुन्हा एक अपघात झाला आहे. फॉर्च्युनर गाडीचा हा अपघात झाला आहे. गाडी तब्बल 200 फूट खाली दरीत कोसळली.
महाडकडून भोरमार्गे पुणे शहराकडे जाणाऱ्या मार्गावर वरंध घाटात गुरुवारी अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर वारवंड गावाच्या हद्दीत फॉर्च्युनर गाडी 200 फूट दरीत कोसळली. त्या अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीतून तीन जण प्रवास करत होते. यामुळे या तिघांच्या बचाव कार्यासाठी गावकरी घटनास्थळी धावले. सुदैवाने गाडीतील तिघही जण बचावले आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्यांना मदत कार्य सुरु केले. गाडीत सुनील गोविंद मोरे, सुरेखा सुनील मोरे आणि अशोक सुरेश कांबळे होते. या तिघ जणांना दरीतून बाहेर काढले. त्यांना जवळच्या प्राथमिक रुग्णालयात नेले. हा अपघात गाडी पुण्याहून महाडच्या दिशेने जात असताना झाला. चालकाला घाटातील वळणाचा अंदाज आला नाही. सर्व जण पुण्यातील भैरवनगर धानोरी रोड, विश्रांतवाडी येथील राहणारे आहेत. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. त्यानंतर यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
रस्ते अपघाताची अनेक कारणे आहेत. त्यात मद्य प्रशान करुन वाहने चालवणे, अधिकवेळ गाडी चावल्यामुळे थकवा येणे, वेगाच्या नियमाचे पालन न करणे, सीट बेल्ट न लावणे, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे, या संबंधाचे नियम पाळले जात नाही. त्यामुळे अपघात होत असतात.