शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. पुणेकरांमध्येदेखील तशी चर्चा पाहायला मिळत आहे. कारण काल शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कात्रजच्या सभेत एक विधान केलं अन् या चर्चांना उधाण आलं आहे. वसंत मोरेंच्या हाती कधीही तुतारी देऊ शकतो, असं जयंत पाटील म्हणाले. त्यांचं हे विधान चर्चेत आहे. याच विधानामुळे वसंत मोरे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मीच जयंत पाटील यांना बोललो होतो. अवघ्या काही महिन्यात महापालिकेच्या निवडणुका आहेत. मी पहिल्यांदाच आयुष्यात राष्ट्रवादीच्या स्टेजवर बसलो होतो. आताच्या घडीला आम्ही हातात मशाल घेऊन तुतारी वाजवायला तयार आहोत. महानगरपालिकेच्या निवडणुकीला देखील मशाल, तुतारी, हाताचा पंजा एकत्र राहिला पाहिजे ही खबरदारी घ्या. आम्ही हातात मशाल घेऊन कधीच तुतारी वाजवायची तयारी केलीय. माझ्या प्रभागात पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला तुतारी हातात घ्यायची गरज पडणार नाही, असं वसंत मोरे म्हणालेत.
शरद पवारांना सोडण्याचं काहीही कारण नाही. सगळ्यांच्या मागे भुंगे होते म्हणून गेले. वसंत मोरे तुम्ही आता मशाल घेतलीय तुमच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ शकतो. वसंत मोरे तुमच्या हातात आता मशाल आहे. तुमच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ शकतो, असं विधान जयंत पाटील यांनी काल कात्रजच्या सभेत केलं. त्यानंतर पुण्यात चर्चांना उधाण आलं. वसंत मोरे ठाकरे गटाला राम राम करत शरद पवार गटात जाणार का? यावर चर्चा होऊ लागली असं असतानाच आता वसंत मोरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडीला 100% पोषक वातावरण आहे. मुस्लिम आणि माळी समाजाचा मतदान महाविकास आघाडीला होणार आहे. भारतीय जनता पार्टीने राजकारणाचा विचका केलाय त्यामुळे लोकांना राजकारणात इंटरेस्ट राहिला नाही. खडकवासला आणि हडपसरमध्ये तुतारीचा आमदार होणार आहे, असं वसंत मोरे म्हणाले.