पुणे : कारागृह कैद्यांसाठी सुरक्षीत राहिले नाही का? हा प्रश्न निर्माण व्हावा, अशी परिस्थिती पुणे येथील येरवडा कारागृहात झाली. या ठिकाणी कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यात दोन जण जखमीसुद्धा झाले आहेत. जखमींवर लागलीच उपचार करण्यात आले आहे. घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कैद्यांनी मिळेल ते साहित्य हातात घेऊन हाणामारी केली. हा प्रकार येरवडा कारागृहातील किशोर विभागातील बॅरक क्रमांक २च्या जवळील हौदाजवळ घडला.
नेमके काय झाले
गेल्या वर्षी आळंदी येथे दोन गटात झालेल्या भांडण प्रकरणात काही जणांना अटक केली होती. त्यानंतर आरोपींना न्यायालयीन कैदी किशोर विभागात ठेवण्यात आले आहे. या विभागात इतरही न्यायालयीन कैदी आहेत. या आरोपींची इतर कैद्यांशी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन त्यांनी प्लास्टिक बकेट, भाजी वाढण्याचे वरगाळे याच्या सहाय्याने दोघांना बेदम मारहाण केली. हे कारागृह शिपायांना समजल्यानंतर त्यांनी दोघांना बाजूला नेले. दोघांवर उपचार करण्यात आले असून येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारागृह असते हाऊसफुल
राज्यातलं सर्वात जुनं आणि मोठं कारागृह अशी ओळख असलेलं पुण्यातलं येरवडा मध्यवर्ती कारागृह नेहमी हाऊसफुल्ल असते. येरवडा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांना ठेवण्यात आलंले असते. जन्मठेप किंवा इतर दीर्घ शिक्षा झालेल्या कैद्यांना येरवडामध्ये ठेवलं जातं. यामध्ये खून खटल्यात शिक्षा झालेल्या कैद्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्याखालोखाल चोरीच्या गुन्ह्यात कैदेत असलेल्यांची संख्या आहे.
ऐतिहासिक महत्व
येरवडा कारागृहाला ऐतिहासिक महत्वसुद्ध आहे. कारण या कारगृहात स्वातंत्रपूर्व काळात महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल आणि मोतीलाल नेहरू यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांना कैदी म्हणून ठेवले होते .निवडणूक जागांच्या आरक्षणावर ऐतिहासिक ‘पुणे करार’ 1932मध्ये येरवडा तुरुंगात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झाला होता. ते ठिकाण तसेच हँगिंग बॅरॅकदेखील या ठिकाणी आहे. पुण्याचे ब्रिटीश प्लेग कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड यांच्या हत्येप्रकरणी चाफेकर बंधूंना या बराकीत फाशी देण्यात आली होती.
हे ही वाचा
तुमच्यासारख्या देशातील 67 कोटी लोकांचा डेटा चोरणारा पोलिसांच्या सापळ्यात