अभिजित पोते, पुणे | 24 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातील गुन्हेगारी कमी होत नाही. कोयता गँगचा उपद्रव सुरु आहे. अधूनमधून व्यापाऱ्यांवर हल्ले होत आहेत. बलात्काराच्या घटना घडत आहेत. खून, दरोडे वाढले आहेत. तसेच अतिरेक्यांची स्लिपर सेल पुण्यात कार्यरत असल्याचे दोन दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर उघड झाले आहे. पोलिसांकडून गुन्हेगारांचा बंदोबस्त केला जात असला तरी गुन्हेगारी कमी होत नाही. गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे आणि येरवडा कारागृह भरले आहे. कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत.
राज्यातील सर्वात जुने कारागृह येरवडा मध्यवर्ती कारागृह आहे. ब्रिटिशांनी हे कारागृह १८७१ मध्ये बांधले होते. ब्रिटीशांच्या राजवटीत येरवडा कारागृहात अनेक स्वातंत्र्यसैनिकांना कारावासात ठेवले होते. स्वातंत्र्यानंतर या कारागृह गुन्हेगारांना ठेवले जात आहेत. परंतु आता हे कारागृह हाऊसफुल्ल झाले आहे. या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवले गेले आहेत. जन्मठेप किंवा इतर शिक्षेचे आरोपी कारागृहात आहे. खून प्रकरणात शिक्षा झालेल्या कैद्यांची संख्या कारागृहात मोठी आहे. सध्या या कारागृहात एकूण 6760 कैदी आहेत.
पुण्यातील येरवडा कारागृहाची क्षमता फक्त 2752 कैद्यांची आहे. परंतु कारागृहात एकूण 6760 कैदी आहेत. म्हणजे क्षमतेपेक्षा 246 टक्के अधिक कैदी दाखल झाले आहे. आता येरवडा कारागृहात कैदी ठेवायला जागाच नाही. यामुळे नवीन येणाऱ्या कैद्यांना ठेवावे कुठे? असा प्रश्न कारागृह प्रशासनासमोर आहे.
येरवडा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. कारागृह फुल्ल झाले आहे. परंतु युवा अवस्थेतील कैदी जास्त येत आहे. यामुळे हा चिंतेचा विषय आहे. युवक गुन्हेगारीकडे वळत आहे. कारागृहातील कैद्यांमध्ये 18 ते 30 वयोगटातील सर्वाधिक कैदी आहेत. शहरात खून, दरोडे, चोऱ्या मारामारीचे प्रमाण अधिक असल्यामुळे या प्रकारातील कैदी अधिक आहेत. युवकांना गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी पोलिसांनी समुपदेशन किंवा अन्य मार्गाचा वापर करण्याची गरज व्यक्त होत आहे.