प्रदीप कापसे, पुणे, दि. 27 नोव्हेंबर 2023 | चहा म्हणजे पुणे शहरातील अमृततुल्य आहे. पुण्यात सर्वत्र चहाच्या दुकानांना अमृततुल्य म्हटले जाते. पुण्यातच नाही तर अनेक ठिकाणी चहा हे आवडते पेय आहे. परंतु एका पुणेकरास चहा पिणे चांगलेच महागात पडले. या प्रकारामुळे तो तरुण जीव गमावून बसला. या प्रकरणी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुण्यातील ही घटना म्हणजे ‘कावळा बसवा आणि फांदी तुटावी’, म्हणीप्रमाणे झाली. विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी मनपा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली आहे.
पुणे येथील कसबा पेठेतील रहिवाशी अभिजित गुंड (३२) यांचा चहा पीत असताना मृत्यू झाला. पुणे येथील ओंकारेश्वर मंदिर परिसरात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. या ठिकाणी झाडाखाली अभिजित गुंड चहा पीत उभे होते. त्याचवेळी त्यांच्या डोक्यात झाडाची फांदी पडली. त्यांना गंभीर मार लागला. या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी तात्काळ त्यांना रिक्षामधून रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अभिजित गुंड हे चहा पिण्यासाठी ओंकारेश्वर मंदिर परिसराखाली असलेल्या टपरीवर आले आणि त्यांचा तो शेवटचा चहा ठरला.
अभिजित गुंड यांच्या मृत्यूला पुणे महानगरपालिकेतील विश्रामबाग क्षत्रीय कार्यालयाचे तसेच गार्डन विभागाचे अधिकारी दोषी आहेत. अधिकाऱ्यांकडे या झाडांसंदर्भात वारंवार तक्रार करून देखील प्रशासन विभाग ढिम्म होते. अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. या सर्व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा करण्यात यावा, अशी मागणी मृत्यू झालेल्या गुंड यांच्या मित्रांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस अधिकारी,कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.