पुणे : तब्बल 32 वर्षानंतर भाजपचा बुरुज ढासळला आहे. कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहे. रवींद्र धंगेकर यांनी 11 हजार 40 मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना पराभूत केलं आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा दणका मानला जात आहे. विशेष म्हणजे राज्यात सत्ता असूनही भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. शिवाय शिंदे गटाचा आणि मनसेचा पाठिंबा असतानाही भाजपला ही सीट राखता आलेली नाही. त्यामुळे भाजपच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर होते. त्यांनी एकाही फेरीत भाजपच्या हेमंत रासने यांना वरचढ होऊ दिलं नाही. प्रत्येक फेरीत त्यांनी दीड ते दोन हजारांची लीड घेतली. त्यानंतर त्यांनी पाचव्या फेरीपासून पाच हजारांची लीड घेतली. ही लीड वाढतच राहिली. पण कमी झाली नाही. अखेर 19व्या आणि शेवटच्या फेरीत त्यांनी 11 हजार 40 मतांची आघाडी घेत हेमंत रासने यांना पराभूत केलं. शेवटच्या फेरीत रवींद्र धंगेकर यांना 73 हजार 194 मते मिळाली. तर हेमंत रासने यांना 62 हजार 244 मते मिळाली.
कसब्यात विजय मिळताच रवींद्र धंगेकर यांच्या समर्थकांनी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत एकच जल्लोष केला. गुलाल आणि हळदीची उधळण करत कार्यकर्त्यांनी ढोलाच्या तालावर ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला. महिला आणि पुरुष कार्यकर्ते तर संपूर्ण गुलालाने माखून गेले होते. अनेकांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला.
1991मध्ये कसबा निडवणुकीत अण्णा जोशी उभे होते. ते विजयीही झाले होते. मात्र, त्यानंतर त्यांना लोकसभेचे तिकीट मिळाले आणि ते लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडमुकीत त्यावेळचे नगरसेवक आणि विद्यमान खासदार गिरीश बापट विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी महापौर वसंतराव थोरात यांचा पराभव केला होता.
यापूर्वी म्हणजे 1991मध्ये झालेल्या कसब्याच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला होता. त्यानंतर काँग्रेसचा सातत्याने पराभव होत गेला. भाजपाने ही जागा राखली होती. 1995 पासून ही जागा भाजपकडे होती. भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी तब्बल 25 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. 2019मध्ये गिरीश बापट खासदार झाले. त्यानंतर मुक्ता टिळक यांना तिकीट देण्यात आले. मुक्ता टिळक या मतदारसंघात मोठ्या फरकाने विजयी झाल्या. त्यामुळे या मतदारसंघावर भाजपचं वर्चवस्व कायम राहिलं होतं.