कोल्हापूर : माजी राज्यपाल भगंतसिंह कोश्यारी यांची वादग्रस्त विधानांवरुन राज्यातील वातावरण मागील वर्षी चांगलेच तापले होते. त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल विधान करून त्यांनी वाद निर्माण केला होता. त्यानंतर त्यांनी आताही छत्रपती शिवाजी महाराज यांची नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्याबरोबर तुलना करुन नवाच वाद निर्माण केला आहे. यामुळे सर्व विरोध पक्ष आक्रमक झाले होते. आता तो वाद शांत असताना काँग्रेसने राज्यात नवीन वाद निर्माण केला आहे. आता काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलरवर राहुल गांधी यांचा व्हिडिओ टि्वट केला आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरचं गाणं लावलं आहे. यामुळे राज्यात भाजप आक्रमक झाली आहे.
काय आहे भाजपचा आरोप
राहुल गांधी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी यांच्यांशी केल्याचा आरोप भाजपने आता केलाय. काँग्रेसने हा व्हिडिओ तातडीने डिलीट करुन माफी मागावी, अशी मागणी केली आहे. राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे हे वेदनादायक आहे. शिवरायांसमोर राहुल गांधी हे मायनस झिरो झिरो आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहे.
काय आहे व्हिडिओ
काँग्रेसकडून राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात भारत जोडो यात्रेसह कर्नाटक निवडणूक आणि इतर ठिकाणीचे राहुल गांधी यांचे व्हिडिओ आणि फोटो आहेत. त्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. एक-एक करून सगळे गड जिंकायचेत. सगळ्या दुश्मनांशी लढून प्रत्येक मैदान जिंकायचं आहे, असं कॅप्शन या व्हिडिओला दिले आहे.
एक-एक करके सब गढ़ जीते,
हर दुश्मन से लड़ रण जीते…? pic.twitter.com/fk7l8FD6uh— Congress (@INCIndia) May 23, 2023
राज्यात भाजपचे आंदोलन
राहुल गांधींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्यामुळे संभाजीनगरात भाजप युवा मोर्चा आक्रमक झाला आहे. क्रांती चौकात युवा मोर्चाची निदर्शने केली आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. युवा मोर्चाचे शेकडो पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोल्हापुरात निदर्शने
छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर राहुल गांधींची तुलना केल्याने भाजप आक्रमक झाली आहे. कोल्हापुरात भाजप युवा मोर्चाची काँग्रेस विरोधात निदर्शन करण्यात येत आहे. कोल्हापूरच्या शिवाजी चौकात युवा मोर्चाने निदर्शने केली आहे.