पुणे: चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे बंडखोर राहुल कलाटे यांनी आपली बंडखोरी कायम ठेवली आहे. उद्धव ठाकरे यांनी फोनवरून संपर्क साधूनही कलाटे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. चिंचवडमधून राष्ट्रवादीचे नाना काटे लढत आहेत. कलाटे यांच्या उमेदवारीमुळे त्यांच्या विजयात मोठा अडसर निर्माण झाला आहे. कलाटे यांनी बंडखोरी केल्याने आता शिवसेनेकडून त्यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर कलाटे यांनीही माझ्यावर काय कारवाई होतेय हे पाहायचं असं म्हणून अप्रत्यक्षपणे पक्ष नेतृत्वालाच म्हणजे उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे.
मी 2019 मध्ये ही विधानसभा निवडणूक लढलो. तेव्हाही शिवसेनेकडून कारवाई होईल, असं बोललं जात होतं. मात्र नेत्यांनाही लक्षात येत असेल की माझ्यावर अन्याय होतोय. ही भावना तेव्हा ही जाणवली होती, त्यामुळेच तेव्हाही माझ्यावर कारवाई झाली नव्हती. पण आता काय कारवाई होतेय याकडे मीही लक्ष देतोय, असं राहुल कलाटे यांनी म्हटलं आहे.
कलाटे यांचं हे विधान म्हणजे थेट पक्ष नेतृत्वालाच आव्हान आहे. त्यामुळे कलाटे यांच्यावर उद्धव ठाकरे काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाना काटे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे कलाटे यांच्यावर कारवाई केली नाही तर चुकीचा मेसेज जाऊ शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मतदानापूर्वीच कलाटे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी लागेल, असं सूत्रांचं म्हणणं आहे.
कलाटे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने चिंचवडमध्ये पोस्टरबाजी सुरू झाली आहे. या पोस्टरमधून कलाटे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. खरा शिवसैनिक असे फ्लेक्स लावू शकत नाही.
ही निवडणूक जनतेच्या मुख्य प्रश्नावर झाली पाहिजे. मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रयत्न आहे. पण हे फ्लेक्स कोणी लावलेत याची ही माहिती घेत आहे, असं ते म्हणाले.
मी अजित पवारांकडे आणि महाविकासआघाडीकडेच उमेदवारी मागत होतो. त्यामुळे दादांचे काय संकेत असतील, हे त्यांनाच विचारावं लागेल. मी बाकी कोणत्याही नेत्याला कधीच भेटायला गेलो नाही. मी फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडेच गेलो होतो. इतर नेत्यांकडे गेलो असतो तर मीडियाने ठेवलेल्या ट्रॅपमध्ये आलोच असतो, असंही ते म्हणाले.