चिंचवड : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव झाला. तर भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या विजयी झाल्या आहेत. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या नाना काटे यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग बंद झाल्याची चर्चा आहे. कलाटे यांनी 44 हजार मते घेतल्यामुळे तसं सांगितलं जात आहे. मात्र, ज्या कलाटे यांच्यामुळे नाना काटे यांना पराभव पत्करावा लागला, त्या राहुल कलाटे यांचं या निवडणुकीत डिपॉझिटच जप्त झालं आहे. आश्चर्य म्हणजे 44 हजार मते घेऊनही त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.
राहुल कलाटे यांच्यामुळे चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार पडला. या निवडणुकीत कलाटे यांनी 44 हजार मते घेतल्यामुळे नाना काटे यांचा पराभव झाला. तरीही कलाटे यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांना एकूण मतदानाच्या एक षष्ठांश मते मिळणे आवश्यक असते. मात्र काल झालेल्या मतमोजणी मध्ये राहुल कलाटे यांना 44 हजार 112 मते मिळाली आहेत. मतदारसंघांमध्ये 2 लाख 87 हजार मतदान झाले. यापैकी 47 हजार 833 मते कोणत्याही उमेदवाराला मिळणे आवश्यक होते. मात्र, कलाटे यांना 47 हजार मतांचा पल्ला गाठता आला नाही. त्यामुळे त्यांना पराभूत व्हावं लागलं आहे. ही मते न मिळाल्यामुळे कलाटे यांच्यासह 28 पैकी 26 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
चिंचवडमध्ये एकूण 28 उमेदवार उभे होते. त्यापैकी भाजपच्या अश्विनी जगताप यांना सर्वाधिक 135603 मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या. राष्ट्रवादीचे नाना काटे यांना 99435 मते मिळाली. तर राहुल कलाटे यांना 44112 मते मिळाली आहेत. इतर उमेदवारांना एक हजाराच्या आत मते मिळाली आहेत. कलाटे यांच्यासह या सर्वच्या सर्व 28 जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
राहुल कलाटे यांचं डिपॉझिट जप्त झालं असलं तरी त्यांनी 44 हजार मते घेतल्याने नाना काटे यांना पराभूत व्हावं लागलं आहे. कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन काटे यांचा प्रचार केला असता तर काटे विजयी झाले असते. मात्र, त्यांनी निवडणूक लढवल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कलाटे अपक्ष म्हणून लढत असले तरी त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कलाटे यांचा प्रचारही केला होता. त्यामुळे दलित समाजातील मते कलाटे यांच्याकडे वळल्याचं सांगितलं जात आहे.