प्रदीप कापसे, पुणे दि. 24 नोव्हेंबर | नोकरी , व्यवसायाच्या निमित्ताने नियमितपणे पुणे- मुंबई असा प्रवास करणारे अनेक जण आहेत. तसेच दोन्ही शहरातील नागरिक विविध कामांसाठी विकेंडला जात असतात. अनेक जण मुंबईत नोकरीला असून विकेंडला पुण्यात घरी जात असतात. या विकेंडला या प्रवाशांची अडचण होणार आहे. मध्ये रेल्वेने पुणे येथे शनिवार, रविवार मेगा ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे पुणे ते लोणावळा लोकलच्या ४६ फेऱ्या रद्द केल्या आहेत. तसेच अनेक एक्सप्रेस गाड्यांवरही या मेगा ब्लॉकचा परिणाम होणार आहे. खडकी ते शिवाजीनगर या दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलोकिंगच्या कामासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी म्हणजे २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे.
मेगा ब्लॉकमुळे शनिवारी मुंबईवरुन पुण्याला येणारी सिंहगड एक्स्प्रेस आणि डेक्कन क्वीन या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच रविवारी सकाळी मुंबईवरुन पुण्याकडे येणारी इंटरसिटी एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच पुण्यावरुन मुंबईला जाणाऱ्या गाड्या रद्द केल्या आहेत. त्यात सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, कोयना एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. पुणे रेल्वे स्थानकावरुन दक्षिणेकडून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेची कामे अनेक ठिकाणी विकास कामे सुरु आहेत. या कामांमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करणे आणि मेगा ब्लॉक घेऊन कामे करणे सुरु आहे. आता पुणे येथील खडकी रेल्वे स्थानक ते शिवाजीनगर रेल्वे स्थानक या दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलोकिंगच्या काम करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन दिवस मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. यापूर्वी लोणावळा रेल्वे स्थानकावर काही तांत्रिक कामांसाठी दोन महिन्यांपूर्वी मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यावेळी अनेक लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या होत्या. पुणे ते लोणावळा दरम्यान लोकल सेवा पूर्ण बंद केली होती.