पुणे | 12 सप्टेंबर 2023 : कृष्ण जन्माष्टमीपासून सुरु झालेला पावसामुळे राज्यात दिलासा मिळाला होता. चार दिवस सर्वत्र चांगला पाऊस झाला. परंतु राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. सध्या पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच पावसाने उघडीप दिली आहे. परंतु ढगाळ वातावरण कायम आहे. तसेच ऊन, सावल्यांचा खेळ सुरू आहे. आता पुढील दोन दिवस हवामानाची परिस्थिती अशीच राहणार आहे, असा अंदाज पुणे हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात पावसाने उघडीप घेतली आहे. मंगळवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. परंतु आता गुरुवार १४ सप्टेंबरपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. संभाव्य कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनसाठी पोषक आहे. यामुळे राज्यात गुरुवारपासून मुसळधार पावसाचे संकेत दिले आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात गुरुवारनंतर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सध्या कुठे हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिलेला नाही.
नांदेडच्या काही भागात मंगळवारी पहाटेच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता. या पावसामुळे हाताशी आलेल्या उडीद मुगाच्या पिकाला मात्र फटका बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यात चार दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली. सातपुडाच्या डोंगर रांगांमध्ये धडगाव, अक्कलकुवा, तळोदा तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. सलग तीन-चार दिवस जोरदार पाऊस झाल्यामुळे शहापूर तालुक्यातील कोरडा पडलेला चोंढा येथील धबधबा पुन्हा प्रवाहित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इगतपुरी शहरात वरुण राजाने दमदार हजेरी लावली आहे. मागील वर्षीपेक्षा कमी पाऊस होऊनही पावसाने आता सरासरी गाठली आहे.