Rain | हिवाळ्यात येणार पावसाचा अनुभव, राज्यात तीन दिवस पाऊस

| Updated on: Nov 23, 2023 | 9:50 AM

Maharashtra Rain and Mumbai, Pune Rain : राज्यात परतीचा पाऊस ऑक्टोबर महिन्यातच गेला. त्यानंतर हिवाळा सुरु झाला. पुणे, मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. परंतु आता या गुलाबी थंडीत पाऊस पडणार आहे. आता स्वेटरबरोबर छतीही लागणार आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

Rain | हिवाळ्यात येणार पावसाचा अनुभव, राज्यात तीन दिवस पाऊस
Follow us on

पुणे, दि. 23 नोव्हेंबर | राज्यात यंदा मनसोक्त मॉन्सून बरसलाच नाही. जून महिन्यात उशिराने दाखल झालेला पाऊस फारसा पडला नाही. त्यानंतर जुलै महिन्यात पाऊस आल्यामुळे सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु पुन्हा ऑगस्ट महिन्यात पावसाने धक्का दिला. चार महिन्यांपैकी दोन महिने पाऊस झाला. परंतु उर्वरित दोन महिन्यांची तूट भरून निघाली नाही. यामुळे यंदा सरासरी मॉन्सून झाला नाही आणि राज्यातील अनेक भागांत दुष्काळ देऊन गेला. परंतु आता हिवाळ्यात राज्यात पाऊस येणार आहे. पुणे हवामान विभागाने २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हा पाऊस मुसळधार असणार आहे.

का पडणार पाऊस

हिवाळी मोसमी वारा व चक्रीय वाऱ्यांच्या परिस्थितीमुळे पाऊस पडणार आहे. सध्या या परिस्थितीमुळे तामिळनाडू आणि केरळमध्ये पाऊस सुरु आहे. ही प्रणाली राज्याच्या पश्चिम किनारपट्टीकडे आगेकूच करुन महाराष्ट्रात येत आहे. यामुळे २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

आज तुरळक पावसाच्या सरी

राज्यात गुरुवारी काही ठिकाणी तुरळक पाऊस पडणार आहे. मुंबईसह सिंधुदुर्ग, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र. धारशिव, लातूर, नांदेड, यवतामाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. पावसाचे वातावरण २६ नोव्हेंबरला अधिक गडद होणार आहे. मध्य महाराष्ट्र, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता हवामान विभागाचे शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली.

मुंबईत मुसळधार पाऊस

मुंबईमध्ये दोन दिवसांपासून अंशतः ढगाळलेले वातावरण असून आठवड्याच्या अखेरीस मुंबई, ठाणे, पालघर परिसरात एखाद्या दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह हलक्या सरींची शक्यता आहे. शनिवार ते सोमवार या ३ दिवसांमध्ये राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी पडू शकतो. २६ नोव्हेंबर रोजी पावसाचे वातावरण तीव्र होण्याचा अंदाज आहे. शनिवारी आणि रविवारी मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत पाऊस होऊ शकतो. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये गुरुवारपासून पावसाचा अंदाज आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शनिवारी आणि रविवारी याची व्यापकता अधिक असेल, असाही अंदाज आहे. शुक्रवारपासून रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशीव येथेही पावसाची शक्यता आहे.