पुणे | 21 सप्टेंबर 2023 : ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात राज्यात पाऊस सुरु आहे. राज्यात गोकुळ अष्टमीपासून सुरु झालेला पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात कायम आहे. आता पुढील तीन, चार दिवस पाऊस कायम असणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे. यामुळे गणेश भक्तांना पावसासोबत गणरायाच्या दर्शनाचा आनंद घ्यावा लागणार आहे. मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी गणरायाचे स्वागतही यंदा पावसानेच झाले होते.
अरबी समुद्रात कमी दबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे आगामी तीन, चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस असणार आहे. काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. राज्यातील तुरळक ठिकाणी, गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण, गोव्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. २१ सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तसेच रायगड आणि रत्नागिरीत यलो अलर्ट दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील पानशेत, वरसगाव, खडकवासला धरण खोऱ्यातील रिमझिम पाऊस सुरु आहे. गेल्या 2-3 दिवसांत खडकवासला धरण साखळीत जवळपास अर्धा टिएमसी पाण्याची भर पडली आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरण साखळीत 93.71 टक्के जलसाठा झाला होता. पुणे परिसरातील चारही धरणात मंदगतीने जलसाठा वाढत आहे. वरसगाव पुन्हा शंभर टक्के भरले तर पानशेतही जवळपास शंभर टक्के भरले आहे.
पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसाचा फायदा दौंड, इंदापूर, हवेली तालुक्यास होणार आहे. जिल्ह्यातील शेतीला याचा फायदा होणार आहे. 19 जुलैपासून शेतीला खडकवासलातून खरीपाचे आवर्तन सुरू आहे. आता पुन्हा 5 आक्टोंबर शेतीला पाणी सोडण्यात येणार आहे. सध्याच्या पावसाचा लाभ शेतीच्या आवर्तनाला झाला आहे.
मुंबई आणि उपनगरात रिमझिम पाऊस सुरु आहे. बुधवारी दीड दिवसाच्या गणरायाच्या निरोपावेळीच दमदार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. या पाण्यातून मार्ग काढत गणेश भक्तांनी गणरायाला निरोप दिला आहे.