पुणे | 16 सप्टेंबर 2023 : राज्यात गणपतीच्या आगमानाची तयारी सुरु असताना मान्सून सक्रीय झाला आहे. गणपती बाप्पा चांगला पाऊस घेऊन येणार आहे. शनिवारी राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. राज्यात यापूर्वी जुलै महिन्यात पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला होता. आता १६ सप्टेंबरसाठी राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच एका जिल्ह्यात रेड अलर्ट दिला आहे. यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र आता पूर्व मध्यप्रदेश आणि लगतच्या भागावर आहे. मध्य प्रदेशमधून कमी दाबाचा पट्टा दक्षिण कोकणपर्यंत तयार झाला आहे. त्यामुळे शनिवारी १६ सप्टेंबर रोजी उत्तर मराठवाडा, उत्तर पश्चिम विदर्भ महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार पाऊस असणार आहे. तसेच पश्चिमी वाऱ्याची तीव्रता जास्त असल्याने कोकण, गोवा, घाट माथ्यावर मुसळधारचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला गेला आहे. शनिवारी मराठवाड्यातील संभाजीनगरा मंत्रिमंडळाची बैठक होत असताना या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे.
राज्यात यंदा जुलै महिन्यात पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला होता. आता त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी दहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यात खान्देशातील नंदूरबार, जळगाव, धुळे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना विदर्भातील अकोला, नागपूर, वर्धा, तसेच मुंबईतील पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्यास पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. रेड अलर्ट विदर्भातील अमरावती जिल्ह्यास दिला आहे.
जळगाव जिल्ह्यात ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहणार आहे. पुढील तीन, चार तासांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात पुढील काही तासांत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे.