पुणे | 1 सप्टेंबर 2023 : पावसाळा यंदा वाटलाच नाही. जून आणि ऑगस्ट महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात पाऊस झाला. यामुळे राज्यातील धरणांमध्ये काही प्रमाणात जलसाठा झाला. शेतकऱ्यांनी पेरणी केली. पिके वाढू लागली. परंतु त्यानंतर ऑगस्ट महिन्यात राज्यातील अनेक भागांत पाऊस नाही. पावसाने २२ ते ३५ दिवसांचा मोठा खंड घेतला आहे. यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. आता रब्बी हंगाम आणि धरणांमधील जलसाठ्यासाठी सप्टेंबर महिन्यावर आशा आहे. हवामान विभागाने महत्वाचे अपडेट दिले आहे. या महिन्यात कधीपासून पाऊस सुरु होणार आहे, याची माहिती दिली आहे.
राज्यात आता पावसाला कधीपासून सुरुवात होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी यासंदर्भात टि्वट करुन माहिती दिली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. सप्टेंबरमध्ये येणार्या 4 आठवड्यांसाठी IMD ने अंदाज जाहीर केला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये दक्षिण द्वीपकल्प, महाराष्ट्र (मराठवाडा), कोकण, गोवासह मध्य भारतातील काही भागांत पावसाला सुरुवात होणार आहे. कर्नाटकात पाऊस सुरु होणार आहे.
31 ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये येणार्या 4 आठवड्यांसाठी IMD च्या पावसाच|अंदाज:सप्टेंबरच्या 1ल्या आठवड्याच्या मध्ये ते सप्टेंबरच्या मध्य; दक्षिण द्वीपकल्प, महाराष्ट्र (मराठवाडा), कोकण, गोवा यासह मध्य भारतातील काही भागांत पावसाच्या चांगल्या पुनरुज्जीवनाची शक्यता.कर्नाटक,केरळ
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 31, 2023
यंदा पावसाच्या सरासरीत मोठी तूट आहे. राज्यातील सर्वच भागात कमी पाऊस पडला आहे. परंतु सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल. यावेळी सरासरी पूर्ण होईल. या महिन्यात ९१ ते १०९ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात होणार असून दुसऱ्या आठवड्यात दमदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
ऑगस्ट महिन्यात यंदा फक्त चार दिवस पाऊस झाला आहे. म्हणजेच महिन्यातील २७ दिवस पाऊस सुटीवर होता. ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठा ब्रेक घेतल्यामुळे 33% कमी पाऊस झाला आहे. राज्यातील मोठे प्रकल्प भरले नाही. आता सर्व आशा सप्टेंबर महिना आणि परतीच्या पावसावर आहे. या वेळी चांगला पाऊस झाला तर धरणांमध्ये जलसाठा वाढणार आहे.