पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यात पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून (Loudspeaker) पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. तीन तारखेपर्यंत हे भोंगे उतरवले नाहीत, तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. एकीकडे राज ठाकरे यांनी हा इशारा दिला आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मात्र समंजस भूमिका घेत शांततेचे आवाहन केले आहे. राज्यातली शांतता टिकून राहावी, यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. संविधानही आपल्याला हेच शिकवते. या संविधानामुळेच देशात शांतता आहे, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे. त्यामुळे राज्यात सध्या या दोन भूमिका महत्त्वाच्या नेत्यांनी मांडल्या आहेत. त्याचे पडसाद कसे उमटतात, ते पाहावे लागेल.
मशिदींवरचे भोंगे हा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे. हे भोंगे माणुसकीच्या नात्याने काढावेत. 3 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम देत आहोत. त्यांना समजले नाही, कायद्यापेक्षा, सुप्रीम कोर्टापेक्षा त्यांना स्वत:चा धर्म मोठा वाटत असेल तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला. राज्यात, देशात दंगली भडकवण्याचा कोणताही हेतू नाही, कोणाच्याही प्रार्थनेला विरोध नाही. मात्र लाउडस्पीकर लावणार असाल, तर आमचीही प्रार्थना ऐकावी लागेल, असे ते म्हणाले. तर आमच्या प्रार्थनेला विरोध कराल, तर आमचेही हात बांधलेले नाहीत, असाही इशारा त्यांनी दिला.
सर्व जातीधर्मात एकोपा राहावा, कोणत्याही धर्मात तेढ निर्माण होऊ नये, असा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. इतर देशांत जसे श्रीलंका, पाकिस्तान यासारख्या देशात काय चालले आहे, याचा विचार करा. आपला मोठा देश एकोप्याने राहावा, याचा प्रयत्न सर्वांनी करावा, हे संविधानात सांगितले आहे. त्याचा अवलंब करावा, असे ते म्हणाले. सध्या राज्यात, देशात काहीजण जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला बळी पडू नका. जातीय वादंगाचा सर्वाधिक फटका हा गरिबांना बसतो, असे ते म्हणाले.