पुणे | 3 मार्च 2024 : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातून एक मोठी बातमी येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आले होते. पुण्यात विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे आले होते. पण पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्तेच वेळेवर न आल्याने राज ठाकरे संतापले. त्यामुळे या संतापाच्या भरातच राज ठाकरे हे पुण्यातून तडकाफडकी मुंबईला रवाना झाले आहेत. यावरून पुण्यातील मनसेच्या संघटनात्मक बांधणी आणि नेत्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मुंबईत आल्यानंतर याबाबत राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आले होते. आठ विधानसभा मतदारसंघांचा राज ठाकरे आढावा घेण्यासाठी आले होते. राज ठाकरे आले तेव्हा पुण्यातील पक्ष कार्यालयात कुणीही उपस्थित नव्हते. राज ठाकरे येणार माहीत असूनही एकही पदाधिकारी न आल्याने राज ठाकरे चांगलेच संतापले. दुपारी अडीच वाजताची बैठक होती. पण उशिरापर्यंतही पदाधिकारी, नेते आले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांचा पारा चांगलाच चढला. त्यानंतर त्यांनी तडकाफडकी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी पुण्याहून मुंबईकडे रवाना झाले.
राज ठाकरे येणार हे माहीत असतानाही विभागप्रमुख पक्ष कार्यालयात आले नाहीत. इतर नेतेही नव्हते. विभागप्रमुखांना फोनही लावण्यात आले. पण कुणीच वेळेत आलं नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी अधिकवेळ वाट न पाहता ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
दरम्यान, पुण्यातील मनसेच्या संघटनेत गटबाजी असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. गटबाजीमुळे पुण्यातील मनसे संघटनेत अनेक वाद निर्माण झाले. राज ठाकरे यांच्यापर्यंत या गटबाजीच्या तक्रारी गेल्या. पण त्यावर ठोस असा तोडगा निघालेला नाही. त्यामुळे पक्षातील धुसफूस कायमच राहिल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, आजच्या प्रकाराने राज ठाकरे प्रचंड संतापले असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईत आल्यावर राज ठाकरे या प्रकरणी संबंधितांकडून खुलासा घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज ठाकरे याप्रकरणी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.