पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीमच्या खाडीतील अनधिकृत दर्ग्याबाबत आवाज उठवला. हा दर्गा अनधिकृत आहे. त्यावर कारवाई करा, नाही तर आम्ही तिथे गणपतीचं मंदिर बांधू, असा इशारा देतानाच राज ठाकरे यांनी प्रशासनाला कारवाईसाठी एक महिन्याची मुदत दिली. त्यांच्या या भाषणानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच कारवाई सुरु झाली. राज ठाकरे यांच्या इशाऱ्याला 24 तास उलटत नाही तोच मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने हे अतिक्रमण हटवले आहे. खाडीतील मजारच्या जागेवरील हिरवा झेंडा हटवण्यात आला आहे. तसेच अनधिकृत मजारवर जेसीबी मशीन फिरवण्यात आली आहे. सांगलीत त्या मशिदीवर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहे. त्याचवेळी पुणे शहरात राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली गेली आहे.
काय आहे तक्रारीत
राज ठाकरे यांनी २२ मार्च रोजी केलेले भाषण हिंदू-मुस्लीम समाजात भांडण लावणार आहे. त्यांच्या भाषणामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण राजकीय दबाबाखाली केले गेले आहे. रमजान महिन्यात केलेल्या या भाषणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे राज ठाकरे यांच्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच त्यांना यापुढे भाषणासाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी तक्रारदार बाजीद राजाक सय्यद यांनी वाकड पोलीस ठाण्यात केली आहे.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्क मैदानावर सभा घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांनी समुद्रात मजार बांधली गेल्याचा दावा केला होता. त्यांनी ड्रोनद्वारे व्हिडीओही दाखवला होता. तसेच पोलिसांना मजारवर कारवाई करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली होती. एक महिन्यात कारवाई केली नाही तर आम्हीही त्याबाजूला गणपतीचं मोठं मंदिर बांधू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले होते. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर अवघ्या 24 तासात मजारवर कारवाई करण्यात आली आहे.
सांगलीतील प्रकरण काय आहे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या गुढीपाडव्याच्या सभेत सांगलीच्या कुपवाडनजीकच्या अनधिकृत मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. एक महिन्यापूर्वी याठिकाणी मशीद बांधकामाच्या वादातून दोन गटात मारामारीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात एका गटाकडून तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी 15 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदरच्या ठिकाणी महापालिकेचे शाळेचे आरक्षण असल्याचा आरोप करत स्थानिक रहिवाशांनी या ठिकाणी या मशिदीला विरोध केला होता.