पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सभेपाठोपाठ सभा घेत राज्यात रान पेटवलं आहे. तब्बल दोन वर्षांनंतर राज ठाकरेंची पहिली सभा गुढी पाडव्याला शिवतिर्थावर झाली. पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलतना त्यांनी गुढी पाडव्याची सभा ही हीट ठरणार असे संकेत दिले होते. त्यानंतर राज ठाकरे शिवतिर्थावर बोलायला उभे राहिले. त्यांनी हिंदुत्वाची (Hindutva) भूमिका उचलून धर मशीदीवरील (Loudspeaker Row) भोंग्यांविरोधात रणशिंग फुकलं. त्यानंतर राज्यातलं संपूर्ण राजकारण ढवळून निघलं. राज ठाकरे या एकाच सभेवर थांबले नाहीत. तर काही दिवसातच राज ठाकरेंनी लगेच विरोधकांना उत्तर देण्यासाठी ठाण्यात सभा घेतली. त्यापाठोपाठ औरंगाबाद आणि आता पुण्यात राज ठाकरे पुढच्या आठवड्यात सभा घेणार आहेत. त्यामुळे आता पुण्यात टार्गेट कोण असणार? असा सवाल विचारण्यात येत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात पुढच्याच आठवड्यात जाहीर सभा होणार आहे. अशी माहिती मनसे नेते किशोर शिंदे आणि बाबू वागस्कर यांनी दिली आहे. तसेच या सभेसंदर्भातली बाकी माहिती राज ठाकरे लवकरच जाहीर करणार असल्याचेही या नेत्यांनी सांगितले आहे. पुण्यात शंभर टक्के सभा होणार आहे, चार ठिकाणी आम्ही परवानगी मागितली आहे, 2 जागेची परवानगी आम्हाला आमच्या हातात आहेत, तसेच उद्या सकाळी 12 वाजता राज ठाकरे पुण्यातील सभेची तारीख आणि ठिकाण जाहीर करणार, असल्याचे मनसे नेते बाबू वागस्कर म्हणाले आहेत.
राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी मनसे नेते वसंत मोरे यांची आणि राज ठाकरे यांची भेट झालीच नाही. कारण राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना भेटीसाठी तर वेळ दिली होती. मात्र राज ठाकरे हे वसंत मोरे यांना न भेटताच मुंबईकडे परतल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरेंच्या मशीदीवरील भोंग्यावरील भूमिकेबाबत वसंत मोरे यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वसंत मोरे यांना पुणे मनसेच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते.
राज ठाकरे यांच्या नदीपात्रातील सभेला गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे. मात्र स्थानिक लेव्हलच्या परवानगी अजून बाकी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच येत्या काही दिवसातच राज ठाकरे यांचा अयोध्या दौराही पार पडत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या दौऱ्याला होणाऱ्या विरोधावर राज ठाकरे काय बोलणार, याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे. राज ठाकरे यांनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत येऊ नये, अशी भूमिका भाजप खासदार बृजभूण सिंह यांनी घेतली आहेत. मनसेकडून मात्र यावर अद्याप प्रतिक्रिया आली नाही.