Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या रडारवर कोण? बृजभूषणसिंह, भाजप, शिवसेना की राष्ट्रवादी?; पुण्यातील राज गर्जनेकडे देशाचं लक्ष

| Updated on: May 21, 2022 | 4:39 PM

Raj Thackeray: राज ठाकरे यांची सभा उद्या सकाळी 10 वाजता पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्राच्या सभागृहात ही सभा होत आहे. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन येत्या 5 जून रोजी अयोध्येला जाणार असल्याचं जाहीर केलं होतं.

Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या रडारवर कोण? बृजभूषणसिंह, भाजप, शिवसेना की राष्ट्रवादी?; पुण्यातील राज गर्जनेकडे देशाचं लक्ष
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची उद्या चौथी सभा उद्या रविवारी पुण्यात पार पडत आहे. राज ठाकरे यांच्या मुंबई, ठाणे आणि औरंगाबादच्या सभा संध्याकाळी झाल्या होत्या. मात्र, उद्याची पुण्यातील सभा ही सकाळी होणार आहे. शिवाय आधीच्या तिन्ही सभा खुल्या मैदानात झाल्या होत्या. तर उद्याची सभा बंदिस्त सभागृहात होत आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बंदिस्त सभागृहात ही सभेतील गर्दीला आपोआपच मर्यादा येणार आहे. मात्र, त्याहीपेक्षा सर्वांचं लक्ष लागलं आहे ते राज उद्या काय बोलणार याकडे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला (Ayodhya) भाजपचे खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी विरोध केला होता. त्यामुळे राज यांना त्यांचा दौरा रद्द करावा लागला. त्यामुळे राज ठाकरे उद्या बृजभूषण सिंह यांना काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज ठाकरे यांची सभा उद्या सकाळी 10 वाजता पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्राच्या सभागृहात ही सभा होत आहे. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन येत्या 5 जून रोजी अयोध्येला जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे मनसेचे नेते, पदाधिकारी हा दौरा यशस्वी करण्यासाठी कामाला लागले होते. राज ठाकरे यांची हिंदू जननायक अशी प्रतिमा तयार करण्यासाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केली होती. अयोध्येला जाण्यासाठी काही ट्रेन बुक करण्यात आल्या होत्या. बायरोडने जाण्यासाठी बसेसही बुक करण्यात आल्या होत्या. मात्र, ही तयारी सुरू असतानाच भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला होता. त्यांनी संपूर्ण उत्तर प्रदेशात राज ठाकरे यांच्या विरोधात वातावरण निर्मिती केली. जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाही, तोपर्यंत राज यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा सिंह यांनी दिला. सभा, संमेलन आणि बाईक रॅली काढून त्यांनी राज ठाकरे यांना जोरदार विरोध केला होता. त्यामुळे राज ठाकरे बृजभूषण सिंह यांना काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सूत्रांच्या मते राज यांच्या भाषणाचा सर्वाधिक फोकस हा बृजभूषण सिंह यांच्यावरच असणार असू शकतो.

हे सुद्धा वाचा

 

भाजपवरही हल्ला चढवणार?

बृजभूषण सिंह यांचा विरोध सुरू असतानाच भाजपचे दुसरे खासदार मनोज तिवारी यांनीही राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला. राज यांनी माफी मागावी, तरच त्यांनी अयोध्येत यावं, असं तिवारी यांनी मुंबईत येऊन सांगितलं. पण हा विरोध होत असतानाच रामलल्ला सर्वांचेच आहेत. राज यांच्या दौऱ्याला कुणीही विरोध करू नये, एवढंच राज्यातील भाजप नेते म्हणत राहिले. पण त्यांनी सिंह यांना विरोध केला नाही. वरिष्ठ नेत्यांकडून सिंह यांच्यावर दबाव आणला नाही. शिवाय भाजपच्या एकाही वरिष्ठ नेत्यांनी बृजभूषण सिंह यांना फटकारले नाही. त्यामुळेही मनसेत अस्वस्थता असून राज ठाकरे हे उद्या भाजप नेत्यांवरही टीका करू शकतात, असं सांगितलं जातं.

पवार पुन्हा टार्गेटवर?

गेल्या तिन्ही सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टार्गेट केलं होतं. उद्याच्याही सभेत पवार हे राज यांचे सॉफ्ट टार्गेट असतील का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुन्नाभाई आणि शाल

काही लोक अंगावर शाल घेत आहेत. त्यांना आपण बाळासाहेब असल्यासारखं वाटत आहे, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज यांना मुन्नाभाई म्हणत त्यांची अवहेलना केली होती. मुख्यमंत्र्यांची ही टीका मनसेच्या पदाधिकाऱ्यांना चांगलीच झोंबली होती. राज ठाकरे या टीकेचा कसा समाचार घेतात हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

भोंगे आणि अयोध्या

राज ठाकरे उद्याच्या सभेत भोंग्याविरुद्धच्या आंदोलनावर भाष्य करण्याची शक्यता आहे. मंदिरांवरीलही भोंगे बंद झाले आहेत. काही ठिकाणी काकड आरती होत नाहीये. त्यावरही राज ठाकरे भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी अयोध्येचा दौरा तूर्तास स्थगित केला आहे. हा दौरा जूनच्या अखेरीस होईल की दिवाळीनंतर होईल, याबाबतही ते काही भाष्य करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.