पुणे: राज्यातील शाळा कधी उघडायच्या याचा निर्णय येत्या चार ते पाच दिवसांमध्ये घेतला जाईल, असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले. शिक्षण विभाग सध्या टास्क फोर्सच्या अहवालाची वाट पाहत आहे. हा अहवाल आल्यानंतर संबंधित विभागाकडून निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. ते गुरुवारी पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी राजेश टोपे यांनी राज्यातील धीम्या लसीकरणासाठी पुन्हा एकदा केंद्र सरकारला जबाबदार धरले. केंद्राकडून लस उपलब्ध होत नसल्याने राज्यात वेगाने लसीकरण करणे शक्य नाही. सध्या राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका आहे. त्यामुळे राजकीय कार्यक्रम आणि इतर ठिकाणी होणारी गर्दी टाळावी. सप्टेंबर महिन्याच्या मध्यात तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, असे टोपे यांनी सांगितले.
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मॉल आणि लोकल ट्रेनने प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. लसीकरण झाल्यानंतरही कोरोना होणारच नाही, याची शाश्वती नाही. मात्र, लस घेतलेल्या व्यक्तींची प्रकृती गंभीर होण्याचे प्रमाण कमी आहे. आता धार्मिक स्थळे आणि इतर ठिकाणच्या प्रवेशाबाबत लवकरच मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही टोपे यांनी म्हटले.
ज्या रुग्णालयांनी रुग्णांकडून अतिरिक्त पैसे आकारले आहेत ते वसूल केले जातील. जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी हे काम करणं क्रमप्राप्त आहे. यामध्ये रुग्णालये आणि डॉक्टर्सनी सहकार्य करावे, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.
कोविशिल्ड’चा साठा संपला शहरात आज 11 केंद्रांवर फक्त ‘कोव्हॅक्सिन’ची लस मिळेल. महापालिकेला ‘कोविशिल्ड’ लशीचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे आज फक्त ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पहिला, दुसरा डोस देण्यात येईल. 18 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’ची लस दिली जाणार आहे. किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या आणि ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होईल.
संबंधित बातम्या: