गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कोल्हापूर | 16 फेब्रुवारी 2024 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे एकेकाळचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी, माजी मंत्री, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांची ईडी चौकशी करण्याची मागणी केली आहे. इकडची तिकडची चौकशी करण्यापेक्षास, याला त्याला ईडी लावण्यापेक्षा उद्धव ठाकरेंना ईडी लावली पाहिजे. आतापर्यंत दिलेले सर्व खोके कुठे गेले? ते सर्व बाहेर आलं पाहिजे. भ्रष्टाचारी कोण आहे ते महाराष्ट्रातील जनतेला कळलं पाहिजे, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
कोल्हापुरात शिवसेनेचं महाअधिवेशन सुरू आहे. त्यासाठी रामदास कदम कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या ईडी चौकशीची मागणी केली आहे. शिवसेनेची पुढील वाटचाल कशी असावी अशा अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मला अनेक वर्ष काम करण्याची संधी मिळाली. पण महाराष्ट्रात बाप-बेटे असे दोघेजण… उद्धव ठाकरे आणि त्यांचे पिल्लू यांचं दोघांचं जर बोलणं आपण ऐकलं, त्यांचे टोमणे जर आपण ऐकले तर विझताना जसा दिवा फडफडतो, तसं ते फडफडताना दिसत आहेत, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर बांधून लाखो लोकांचं स्वप्न पूर्ण केलं. चंद्रावर यान पाठवून विज्ञानक्षेत्रात मोठी झेप घेतली. अबूधाबीत मंदिरही बांधलं. तरीही उद्धव ठाकरे हे मोदींनाच बोलत असतात. त्यांच्यावर टीका करत असतात. यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं होतं. नालायक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. अडीच वर्षात ते फक्त अडीच तासच मंत्रालयात बसले, अशी घणाघाती टीकाही रामदास कदम यांनी केली.
आमच्या 40 आमदारांपैकी एकाने जरी 50 खोके घेतल्याचं उद्धव ठाकरे यांनी सिद्ध केलं तर मी उद्धव ठाकरे यांच्या घरी भांडी घासेन. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. हे बापबेटे फक्त चाळीस आमदारांना बदनाम करण्याचं काम करत आहेत. आपल्यातून 40 आमदार का निघून जातात याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. माझी आमदारकी काढली, माझं मंत्रिपद काढलं, मी मिठाई देण्यात कमी पडलो, नाहीतर मंत्री असतो. रवींद्र वायकर का मंत्री झाले? हे वायकरांनी सांगावं? असं सूचक विधानही त्यांनी केलं.
माझं मंत्रीपद काढलं आणि काढून कोणाला दिला तर आदित्यला. कारण बाप मुख्यमंत्री होता म्हणून मला गेट आऊट म्हणाले. आपल्या मुलासाठी उद्धव ठाकरे यांनी सुपारी घेतली. ज्यांच्या भाषणाला जास्त टाळ्या मिळतील त्यांची भाषणे बंद केली, असा आरोपही त्यांनी केला.