संदीप शिंदे, सोलापूर | 31 ऑक्टोंबर 2023 : राज्यातील मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आरक्षण देण्यासाठी ४० दिवसांची मुदत दिली. त्या मुदती दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात विविध ठिकाणी सभा घेऊन समाजात जनजागृती निर्माण केली. तसेच सरकारला ४० दिवसानंतर एक तासही मिळणार नसल्याचे सांगितले. मनोज जरांगे पाटील यांची सभा सोलापूरमधील पंढरपूरमध्येही झाली. त्या सभेला सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदार संघातील अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या पुत्राने आर्थिक मदत केली. त्यांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. त्यानंतर मराठा तरुणांनी केलेल्या अनोख्या आंदोलनामुळे आमदार पुत्र हैराण झाले आहेत.
मनोज जरांगे पाटील ५ ऑक्टोबरपासून सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी मंगळवेढा, बार्शी, कुर्डुवाडी, पंढरपूर या तालुक्यांच्या ठिकाणी सभा घेतल्या. त्यांची सभा पंढरपूरमध्येही झाली. या सभेला सोलापूरच्या माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे याचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांनी मदत केली होती. त्यासंदर्भातील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले. हे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यामुळे मराठा समाजातील तरुण संतप्त झाले. त्यांनी त्यासाठी अनोखे आंदोलन सुरु केले.
आमदार पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या सभेला आर्थिक मदत केल्याचे रेकॉर्डिंग व्हायरल झाले. त्यामध्ये रणजितसिंह शिंदे यांनी पंढरपूरमधील मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेचा खर्च केल्याचे वक्तव्य केले होते. हा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर मराठा आंदोलक संतप्त झाले. त्यांनी आमदार रणजितसिंह शिंदे यांना फोन पे द्वारे पैसे पाठवण्याची मोहीम सुरु केली. पंढरपूर तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून रणजितसिंह शिंदे यांना फोन पै वरुन १, २, ५ रुपये पाठवण्यास सुरूवात केली आहे. फोन पै वरुन येणार्या असा पैश्यांमुळे रणजितसिंह शिंदे हैराण झाले आहेत.
आमदार बबनराव शिंदे याचे सुपुत्र असलेले रणजितसिंह शिंदे हे सहकारच्या माध्यमातून राजकारणात आहे. सोलापूर जिल्हा दूध संघाचे ते चेअरमन आहेत. मालोजी चव्हाण या मराठा तरुणाने मराठा आरक्षणावरुन शिंदे यांना जाब विचारल्यानंतर शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या सभेचा खर्च आपण केल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांनी त्याच्याविरोधात आर्थिक मदत पाठवण्याचे आंदोलन केले.