PUNE : काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या शिक्षणावरुन त्यांना ट्रोल करणारी एक पोस्ट व्हायरल झाली आहे. धंगेकरांनी यामागे भाजपकडे बोट दाखवलंय तर पुणे भाजपच्या नेत्यांनी त्या पोस्टशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा केलाय. सध्या पुणे लोकसभेत भाजपकडून धंगेकरांच्या ट्रोलिंगसाठी वापरल्याचा आरोप होतोय. मविआचा अशिक्षित उमेदवार, रविंद्र धंगेकर फक्त आठवी पास, पुणे शिक्षणाचे माहेरघर…पण पुण्याचा उमेदवारच अशिक्षित…. असं या पोस्टरमध्ये म्हटले आहे. यावरुन भाजपनं आपलं शिक्षण काढलं असलं तरी जनतेच्या कामात माझी पीएचडी असल्याचं उत्तर काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकरांनी दिलंय. तर सोशल मीडियावरच्या या प्रचारावर भाजप नेत्यांची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.
कसपा पोटनिवडणुकीवेळी प्रतिस्पर्ध्यांकडून नकारात्मक प्रचार धंगेकरांच्या फायद्याचा ठरला होता. त्यावेळी ‘हू इज धंगेकर” हा चंद्रकांत पाटलांच्या प्रश्न भाजपवरच बूमरँग झालेला आहे. दरम्यान भाजपकडून मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर पुणे लोकसभेत मैदानात आहेत. मोहोळ चार वेळा नगरसेवक, पुण्याचे महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, महापौर परिषदेचे उपाध्यक्ष अशा पदांवर मोहोळ राहिले आहेत.
पुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनचे संचालक, याशिवाय पीएमपीएमएलचे संचालक राहिले आहेत. 2009 ला खडकवासलातून उमेदवार होते.
सामान्य जनता ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतचे चांगले संबंध त्यांची जमेची बाजू आहे.
दुसरीकडे धंगेकरदेखील ४ वेळा नगरसेवक राहिले आहेत. त्यांची राजकीय सुरुवात शिवसेना आणि मनसेतून झाली. 2009 ला कसब्यात बापटांविरोधात धंगेकरांचा अवघ्या ७ हजार मतांनी पराभव झाला होता. गेल्यावर्षी भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या कसब्यातून ते आमदार झाले.
दांडगा जनसंपर्क, २४ तास फोनवर उपलब्ध असणारा नेता ही रविंद्र धंगेकरांची जमेची बाजू आहे. कसबा विजयात काँग्रेसबरोबरच स्वतः धंगेकरांच्या जनसंपर्काचाही वाटा मोठा होता. त्यामुळे आता पुणेकर मतदार कोणाला संधी देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.