प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी (IAS) पूजा खेडकर यांच्या मागे वादाचे मोहोळ लागले आहे. अडचणी त्यांच्या मागे हात धुवून लागल्या आहेत. त्यांच्या आई मनोरमा खेडकर या अडचणीत आल्या आहेत. शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखविल्याप्रकरणात त्यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागाला आहे. तर आता त्यांचे वडिल दिलीप खेडकर यांची चौकशी का केली नाही, असा खडा सवाल काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी विचारला आहे. जर पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाईस हात आखडता घेतला तर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
रवींद्र धंगेकर यांचा पुणे पोलिसांना इशारा
पूजा खेडकर यांच्या वडिलांची पण चौकशी करा अशी मागणी काँग्रेस नेते धंगेकर यांनी केली आहे. तिच्या वडिलांनी एवढी संपत्ती जमवली कशी याची पण चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली.आईने पिस्तुल दाखवल त्यावर कारवाई झाली पाहिजे अन्यथा उद्या पोलीस अधीक्षक कार्यालयात आंदोलनाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
ऑडी कार पोलिसांच्या ताब्यात
खेडकर कुटुंबाने काल रात्री ऑ़डी कार स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात दिली. मात्र पुणे पोलिसांकडून या कारच्या कागदपत्राची मागणी करण्यात आली आहे. कागदपत्र अजूनही खेडकर परिवाराने दिली नाहीत. पुणे पोलिसांकडून संपर्क करण्याचा प्रयत्न मात्र कोणतही प्रतिसाद त्यांच्याकडून देण्यात आला नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ऑडी कार चालकाने रात्री आणली.
बंगल्यावर लावली नोटीस
आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सकाळीच पुणे पोलीस त्यांच्या बंगल्यात दाखल झाले. पण घरात कोणी नसल्याने पोलीस परत गेले. पुणे पोलिसांकडून त्यांना आणखी एक नोटीस देण्यात आली आहे. वापरलेलं पिस्तुल जप्त का करण्यात येऊ नये ? असा सवाल पोलिसांनी केला.
अजित पवार यांच्यावर टीका
पक्षाच्या विरोध मतदान केलं असेल तर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी केली. पुन्हा ते अस करायला धजवणार नाहीत. आमदारांवर कारवाई केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजित पवार हे अडचण दूर करण्यासाठीच महायुतीसोबत गेले आहेत. त्यांच्यावर कारवाई होईल असं वाटत नसल्याची प्रतिक्रिया धंगेकरांनी दिली. राज्यात विधानसभेला महाविकास आघाडीच सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.