राज्यातील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेची निवडणूक बारामतीची ठरली होती. बारामतीमध्ये लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पवार कुटुंबियांमध्ये लढत झाली. काका अजित पवार आणि पुतण्या युगेंद्र पवार यांची लढत चर्चेची ठरली. या लढतीत अजित पवार विजयी झाले. त्यानंतर काकाविरुद्ध पुतण्याने पुन्हा फेरमतमोजणीचा अर्ज दिला आहे. त्यासाठी लागणारी रक्कमसुद्धा भरली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये पाच टक्के ईव्हीएमची फेरमतमोजणी होणार आहे, असे युगेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
पुणे जिल्ह्यातून ११ उमेदवारांनी पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. त्यासाठी ६६ लाख रुपये भरले आहेत. यासंदर्भात बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत फक्त माझाच पराभव झाला असता तर मी अर्ज केला नसता. कारण बारामतीमध्ये कोणी उभे राहण्यासाठी तयार नव्हते. आमच्या पुढची ताकद मोठी होती. आमच्या पुढे आव्हान मोठे होते. राज्याचे उपमुख्यमंत्री होते. परंतु आम्ही विचार सोडले नाही. त्यामुळे आम्ही लढलो.
आम्ही पराभूत झालो असलो तरी बारामतीकरांसाठी आम्ही काम करत आलो आहे. यापुढेही करत राहू, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीबाबत अख्ख्या महाराष्ट्रात संशयाचे वातावरण आहे. दिग्गज नेते जे अनेक दशकांपासून निवडून येत आहेत, त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आम्ही पक्षाच्या बैठकीत यावर चर्चा केली. त्यानंतर आम्हाला सुप्रीम कोर्टाने 5 टक्के ईव्हीएम तपासायचा अधिकार दिला आहे. त्यानुसार आम्ही पडताळणीसाठी अर्ज करणार आहोत.
युगेंद्र पवार यांचे मतदार संघात दौरे सुरु आहे. त्याबाबत ते म्हणाले, फक्त प्रचारासाठी जाणे आम्हाला पटत नाही. बारामतीमधील लोकांनी आम्हाला मतदान केले आहे. त्यामुळे गावागावांत जाऊन लोकांना भेटत आहोत. त्यांना विश्वास देत आहोत. त्यांचे आभार मानत आहोत. नेहमीसारखा हा आभार दौरा आहे. लोकसभेतही आम्ही हा दौरा केला होता. पवार साहेबांनी दिलेल्या शिकवण दिली आहे. बाबा आढाव आंदोलनाबाबत बोलताना ते म्हणाले, बाबा खूप ज्येष्ठ आहेत. सगळ्यात जास्त अनुभव आहे. त्यांनी अनेक निवडणूका बघितल्या आहेत. त्यांना काहीतरी वाटत असेल त्यामुळे त्यांनी आंदोलन केले. आपल्याला ते गंभीरतेने घ्याव लागेल.