पुणे | 5 ऑगस्ट 2023 : पुणे शहराजवळील आळंदीमध्ये डोळ्यांच्या आजाराची साथ अटोक्यात येत नव्हती. आरोग्य विभागाच्या पथकाने त्या ठिकाणी आपला मुक्कम ठोकला. त्यानंतर त्यावर मात करण्यात यश आले. परंतु ही साथ आता राज्यात सर्वत्र सुरु झाली आहे. त्याचवेळी पुणे शहरात श्वसनाचे आजार वाढत आहे. यासंदर्भातील रुग्ण अचानक वाढले आहे. पुणे शहरात सुमारे 25 टक्के रुग्ण श्वसनाच्या विकाराचे येत आहेत तर मुलांमध्ये हे प्रमाण 40 टक्के आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.
पुणे शहरातील रुग्णालयांमध्ये श्वसनासंबंधी विषाणूजन्य आजार आणि न्यूमोनियाच्या रुग्ण अचानक वाढले. त्याचे मुख्य कारण तापमान आहे. सध्या शहराचे तापमान 30 डिग्री सेल्सिअसच्या खाली आहे. रात्रीचे तापमान 22 डिग्री सेल्सियसच्या जवळ आहे. आर्द्रता पातळी सरासरी 80% पेक्षा जास्त आहे. यामुळे अल्पवयीन आणि प्रौढ व्यक्तींमध्ये श्वसनाच्या समस्या निर्माण होत आहे. या आजाराचे अनेक रुग्ण आयसीयूमध्ये दाखल होण्याचे प्रमाण मागील दोन आठवड्यांपासून वाढले आहे.
श्वसनाच्या आजार मुलांमध्ये अधिक वेगाने पसरत आहे. सुमारे 40 टक्के मुलांमध्ये हे प्रमाण असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ अमिता कौल यांनी सांगितले. हा आजार का आला यासंदर्भात बोलताना डॉ. कौल यांनी सांगितले की, सध्या पुणे शहरातील हवामान खूपच थंड आहे. वातावरणात ओलसरपणा आहे, सूर्यप्रकाश किंवा ऊन नाही. त्यामुळे या वातावरणात आजाराचे संक्रमण अधिक होत असते.
सध्या लसीकरण केलेल्या मुलांना देखील हा आजार होत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळाच्या तुलनेत या प्रकारातील रुग्णांचे प्रमाण 40-50 टक्के वाढले आहे. फ्लू सारख्या आजारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्याला कारण वातावरण हेच आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या हा आजार होता. परंतु त्यावेळी त्याचे प्रमाण कमी होते. आता अंदाजे 20-25% ने या आजाराचे रुग्ण वाढले आहे. वातावरण चांगले झाल्यानंतर हे रुग्ण कमी होतील, असे डॉक्टरांनी सांगितले.