प्रदीप कापसे, पुणे | 4 ऑगस्ट 2023 : भाजप नेते गिरीश बापट यांचे निधन झाल्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघांची जागा रिक्त झाली आहे. आता या ठिकाणी पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही. कारण त्यांच्या निधनानंतर अजूनही पोटनिवडणूक जाहीर झाली नाही. यामुळे भाजपने मिशन 2024 ची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी लोकसभा मतदार संघानुसार जबाबदारी निश्चित केली गेली आहे. या प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाचे नेते महेश लांडगे यांना धक्का दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात समन्वयक भाजपकडून नेमले आहे. पुणे लोकसभा मतदार संघाची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिली होती. त्यानंतर शरद पवार यांचे वर्चस्व असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी राहुल कुल यांच्याकडे दिली. तसेच जून महिन्यात शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे दिली होती. परंतु आता शिरुरची जबाबदारी महेश लांडगे यांच्याकडून काढून घेतली आहे. आता ही जबाबदारी राजेश पांडे यांच्याकडे दिली आहे.
राजेश पांडे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून भाजपमध्ये आले आहेत. अभविपचे प्रदेशाध्यक्ष ते होते. त्यावेळी अभिविपचे संघटन त्यांनी मोठ्या कौशाल्याने सांभाळले होते. आता भाजपचे ते उपाध्यक्ष आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. पुणे विद्यापीठ आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राधिकरणावर त्यांनी काम केले आहे.
राजेश पांडे यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून मांडलेली ‘मेरी माटी, मेरा देश’ या देशव्यापी अभियानाची जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे. या अभियानाच्या संजोयकपदी राजेश पांडे यांना नेमले आहे. देशासाठी प्राणांची बाजी लावलेल्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्वानिमित्ताने मेरी माटी मेरा देश हा उपक्रम साकरला जात आहे. या उपक्रमाची महाराष्ट्राची जबाबदारी राजेश पांडे यांच्याकडे दिली गेली आहे. या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे.