पुणे | 19 ऑक्टोंबर 2023 : पुणे आणि नाशिक ही दोन महत्वाची शहरे रेल्वेने जोडली गेली नाही. ही शहरे जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या मार्गावर सेमीहायस्पीड ट्रेन धावणार आहे. महारेलच्या वतीने पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे काम सुरु करण्यात आले आहे. पुण्यात नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात बैठक घेतली होती. त्या बैठकीत हा मार्गाचे काम लवकर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. भूसंपादनाच्या अडचणी दूर करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. ही सर्व प्रक्रिया सुरु असताना आणखी एक महत्वाचे अपडेट आले आहे.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा प्रस्ताव मध्य रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. परंतु त्यात काही त्रुटी आढळून आल्या. यामुळे त्यावर अद्याप अंतिम निर्णय घेतला गेला नाही. आता या त्रुटींवर मध्य रेल्वेकडून काम करण्यात येणार आहे. त्या त्रुटी दूर करुन नवीन प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. त्यानंतरच सेमी हायस्पीड रेल्वेचा अंतिम आराखडा तयार होणार आहे. त्रुटी दूर करुन पाठवलेल्या अंतिम आराखडा रेल्वे बोर्ड आणि पंतप्रधान कार्यालयास मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.
235 किलोमीटरचा हा मार्ग पुणे, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातून जातो. नगर जिल्ह्यात खोडद (ता. जुन्नर) येथे जीएमआरटी प्रकल्प आहे. महाकाय दुर्बिण असलेल्या या प्रकल्पाजवळून रेल्वे लाईन जात आहे. त्यासंदर्भात अद्यापपर्यंत मार्ग निघालेला नाही. त्यामुळे ही समस्या सोडवावी लागणार आहे. त्यानंतरच सेमीहायस्पीड ट्रेनचा मार्ग मोकळा होणार आहे.
235 किलोमीटरच्या या प्रकल्पात 18 बोगदे आणि 19 उड्डाणपूल आहेत. या मार्गावरुन 200 किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वे धावणार आहे. संपूर्ण विद्युतीकरण असलेला हा दुहेरी मार्ग असून पहिल्या टप्प्यात 6 कोचची रेल्वे नंतर 12 ते 16 कोचची होणार आहे. या मार्गावर 20 स्टेशन असतील. या प्रकल्पासाठी सुमारे 16 हजार 39 कोटींपर्यंत खर्च येणार आहे. यामुळे पुणे-नाशिक प्रवास अवघ्या 1 तास 45 मिनिटांत पूर्ण होणार आहे.