रणजित जाधव, पुणे, दि.18 जानेवारी 2024 | पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरातील नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. काही वर्षांनी या ठिकाणी नदी होती? असे म्हणावे लागणार आहे. कारण या नद्यांमध्ये उघडपणे भराव टाकला जात असताना महानगर पालिकेचे पर्यावरण विभाग झोपेचे सोंग घेत आहे. नुकतेच पर्यावरण विभागाने पिंपरी-चिंचवडमधून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांमध्ये भराव आणि राडारोडा टाकणाऱ्यांवर किरकोळ कारवाई केली आहे. ६ ट्रक आणि टेम्पो जप्त करत ६५ हजारांचा दंड वसूल केला आहे. मात्र, याआधी नद्यांमध्ये भराव टाकून नदीपात्र अरुंद करणाऱ्यांवर कारवाई कधी? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अशा अनेक ठिकाणी पर्यावरण विभाग कारवाई करत नाही, यामागे काय गणित आहे, असा प्रश्न पर्यावरण प्रेमींना पडला आहे.
पिंपरी- चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी वाहते. काही वर्षांपूर्वी या नद्या मोकळा श्वास घ्यायच्या. सध्या मात्र या नद्यांचा श्वास गुदमरतो आहे, अशी अवस्था आहे. शहरातून वाहणाऱ्या पवना नदीला आधीच अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे. त्यात आता पवना नदीच्या अस्तित्वचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीत राडारोडा आणि भराव टाकला जात आहे.
नदीपात्र अरुंद होत असल्याने येत्या पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. पाण्याचे लोंढे थेट शहरातील काही भागांमध्ये येऊ शकतात. आधीही अशी पूर परिस्थिती शहरात उदभवली होती. तरीही महानगर पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या ढिम्म आहे. सापडला तो चोर अन्यथा जगापेक्षा थोर अशी अवस्था पर्यावरण विभागाची आहे. किरकोळ कारवाई करून पर्यावरण विभाग वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे केवळ कारवाई केल्याचा दिखावा करत आहे.
“आम्ही नेहमीच अशा ठिकाणी कारवाई करत आहोत. यापुढे ही नद्यांमध्ये राडारोडा, भराव टाकताना व्यक्ती आढळल्यास कारवाई करणार आहोत. ज्या ठिकाणी भराव टाकला गेला आहे. त्या ठिकाणी बिल्डिंग परमिशन, बिट निरीक्षक कारवाई करत आहेत,” असे पर्यावरण विभाग, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.