पुणे : प्रकाश आंबेडकरांच्या पक्षानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आम्हालाही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मात्र अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होऊ नये यासाठी सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांच्या पक्षानं मागच्या निवडणुकांमध्ये प्रचंड मते खाल्ली. त्यामुळे भाजपचे 7 खासदार आणि 22 आमदार निवडून आले, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. मनभेदही नाही. सगळ्यांनी एकत्रित येऊन लढलं पाहिजे. महाविकास आघाडी त्याच भूमिकेने काम करत आहे. भाजपच्या विरोधात लोकांचा रोष आहे, नाहीतर जनता आपल्यालाही सोडणार नाही, असं रोहित पवार म्हणाले.
महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ आहे, असं विधान राष्ट्रावादीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. त्यावरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवार आकड्यांवर बोलतात. आजच्या घडीला राष्ट्रवादीकडे जास्त आमदार आहेत. शरद पवार मोठे मार्गदर्शक आहेत. त्यांचा अनुभव पाहता अनुभवाने राष्ट्रवादी मोठा भाऊ आहे. त्याचा अर्थ असा नाही की आम्ही जास्त जागा मागणार किंवा कमी मागणार. मात्र राष्ट्रवादी मोठा भाऊ आहे असं म्हणणं योग्य आहे, असंही ते म्हणाले.
यावेळी रोहित पवारांनी राज्य सरकारवरही गंभीर आरोप केला. राज्यात 50 टक्के कमिशनचा रेट सुरू आहे. पैसा कोणापर्यंत जातो माहिती नाही. मात्र राजकारणासाठी आणि लोकांना फोडण्यासाठी हे पैसे वापरले जातात. पैसे खिशातून जात नाही. कुठून येतात याचा अंदाज आता सामान्य लोकांना आला आहे, असं त्यांनी सांगितलं.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका मांडली होती. या प्रकरणात बाहेरच्यांनी लक्ष घालू नये. त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांवर तो प्रश्न सोपवा, असं राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं रोहित पवार यांनी स्वागत केलं आहे. ते आता सत्याच्या बाजूने आले आहेत, असं पवार म्हणाले.