पुणे | 22 ऑक्टोंबर 2023 : सध्या ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2023 सुरु आहे. या वर्ल्डकपचा भारत-बांगलादेश सामना नुकताच पुणे शहरात झाला होता. या सामन्यासाठी भारतीय संघ पुण्यात येत होता. त्यावेळी रोहित शर्मा याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर लेम्बोर्गिनी उरुस (Lamborghini Urus) गाडी वेगाने चालवली. त्याच्या गाडीचा वेग 200Km/h असल्याच्या बातम्या आल्या होता. आता रोहित शर्मा याच्या गाडीचा वेग किती होतो? त्याला किती दंड झाला? यासंदर्भातील माहिती आणि फोटो समोर आले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर सुसाट गाडी चालवल्यामुळे रोहित शर्मा याला दंड झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
रोहित शर्मा याला झालेल्या दंडाची ऑनलाइन कॉपी लीक झाली आहे. महामार्ग पोलिसांनी जारी केलेल्या चलननुसार लेम्बोर्गिनी उरुस SUV गाडीने वेगाची मर्यादा तोडल्यामुळे दंड झाला आहे. भारत-बांगलादेश सामन्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन जाताना रोहित शर्मा याच्या ‘264’ क्रमांकाच्या लेम्बोर्गिनी गाडीने वेगाची मर्यादा सोडली. या गाडीने दोन वेळा वेगाची मर्यादा तोडली.
मुंबई-पुणे महामार्गावर रोहित शर्मा याने दोन वेळा वेगाची मर्यादा तोडली. या महामार्गावर 105Km/h ची मर्यादा आहे. दुपारी 2:54 वाजता कामशेत बोगद्याजवळ असताना रोहित शर्मा याने पहिल्यांदा वेगाची मर्यादा तोडली. यावेळी त्याच्या गाडीचा वेग 117Km/h नोंदवला गेला. दुसऱ्यांदा सोमाटाने फाटा या ठिकाणी त्याच्या SUV लेम्बोर्गिनी गाडीने वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन केले. त्यावेळी 111Km/h गाडीचा वेग होता. यामुळे रोहित शर्मा याने 200Km/h वेगाने गाडी चावल्याच्या आलेल्या बातम्या चुकीच्या होत्या.
रोहित शर्मा याने वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन केले. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन वेळा ऑटोमेटेड कॅमेऱ्याने त्याच्या गाडीला कैद केले. गाडी ओव्हरस्पीड होताच हे कॅमेरे त्वरित रेकॉर्ड करतात. रोहित शर्मा याची गाडी दोन वेळा ओव्हरस्पीड होती. त्यामुळे प्रत्येक वेळेस 2000 रुपये म्हणजेच एकूण 4000 रुपये दंड त्याला झाला.