पुणे – वर्षातील ३६५ दिवस आपले कर्तव्य बजावणाऱ्या अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना ओवाळून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपली भाऊबीज साजरी केली. गेल्या अनेक वर्षांपासून भाऊबीजेचा सण हा सर्वप्रथम अग्नीशामक दलाच्या जवानांसोबत साजरा केला जातो. त्यानंतरच कुटुंबीयांबरोबर भाऊबीज साजरी केली जाते, अशी माहिती चाकणकर यांनी दिली. भोई प्रतिष्ठानतर्फे या भाऊबीजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिवाळीच्या सणातही एखाद्या ठिकाणी आपत्ती निर्माण झाली तर जिवाची पर्वा न करता, स्वतः च्या कुटुंबियांचा विचार न करता हे अग्नीशामक दलाचे जवान आपले कर्तव्य पार पडतात. त्यामुळे आजचा भाऊबीजेचा सण हा त्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यासारखा असल्याची भावना रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली.
महिलांनी टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यापासून कामाला सुरुवात केली आहे. बीट मार्शल, निर्भया पथक, भरारी पथके ऑक्टिव्ह केली आहेत. शहरी भागांसाठी 1091, तर ग्रामीण भागांसाठी 112हा टोला फ्री क्रमांक आहे. महिलांना ज्या ज्या वेळी असुरक्षित वाटेल तसेच घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरत असतील आणि पोलीस स्टेशनपर्यंत जाऊ शकत नसतील तेव्हा तेव्हा या टोल फ्री क्रमांकाचा वापर निश्चित करावा, असे आवाहन चाकणकरांनी केले आहे.
मनोधैर्य योजना व निर्भया फंड त्रुटी दुरुस्त करणार
मनोधैर्य योजना व निर्भया फंड निधीबाबत मागील तीन -चार दिवसांपूर्वीच राज्यात सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद ,पंचायत समिती अगदी ग्रामसेवकांनाही सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी बालविवाह घडतात त्या ठिकाणी तपास अधिकाऱ्यांच्या टीममध्ये सहभागी होऊन ही यंत्रणा राबवावी असे सांगण्यात आले आहे. मनोधैर्य योजनेअंतर्गत महिलांना मदत पोहचवली जाईल तसेच या योजनेत जिथे जिथे त्रुटी आढळतील तिथे राज्य महिला आयोग सुधारणा करेल. राज्यातील महिला अत्याचाराचे प्रकार थांबवण्यासाठी राज्य महिला आयोग अधिक सक्षमपणे काम करेल असेही चाकणकर म्हणाल्या.
हे ही वाचा :
महापौर किशोरी पेडणेकरांनी साजरी केली भाऊबीज; मुंबईकरांना दिल्या शुभेच्छा
पोटनिवडणुकीतील पराभवामुळे दरवाढ कमी केल्याचा दावा खोटा; चंद्रकांत पाटलांनी आरोप फेटाळले
खंडणी वसुलीप्रकरणी सचिन वाझेला दिलासा नाहीच; 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी