पुणे : मंत्रिमंडळ विस्तार लांब आहे गोपीचंद पडळकर. शिमग्याच्या अगोदरच शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल बोंबलायला सुरुवात करू नका, अशी टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर केली आहे. पवार कुटुंबीयांच्या रेशन कार्डाची चौकशी करावी, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांवर हल्लाबोल केला होता. त्याला रिपाइं खरात गटाने टीका केली आहे. सचिन खरात यांनी पडळकर यांच्यावर टीका करताना म्हटले, की गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) तुम्हाला मंत्रीपद मिळाले नाही, म्हणून तुम्ही दु:खी आहात, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. परंतु काही मालक दोन तऱ्हेचे प्राणी पाळतात एक चावायला आणि दुसरा फक्त जोरजोरात ओरडायला. त्यामुळे तुम्हाला फक्त जोरात ओरडण्यासच ठेवले आहे, अशी टीका सचिन खरात यांनी केली आहे.
मंत्रिमंडळात तुमचा समावेश झाला नाही, म्हणून पवार साहेब यांच्यावर ओरडू लागला आहात. पवार घराण्याच्या रेशन कार्डच्या चौकशीची मागणी करत आहात. परंतु तुम्ही आटपाडीमध्ये किती अध्यात्मिक काम केले आहे, याची नोंद तुमच्या रेशन कार्डावर झाली असेल, ते जनतेपुढे मांडा. त्यामुळे पडळकर मंत्रिमंडळ विस्तार लांब आहे. शिमग्याच्या अगोदर शरद पवार यांच्याबद्दल बोंबलायला सुरुवात करू नका, असा हल्लाबोल सचिन खरात यांनी पडळकर यांच्यावर केला आहे.
संपूर्ण पवार कुटुंबाच्या रेशनकार्डावर असलेल्या व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली होती. यावर जेवढी नावे आहेत, त्यांची सखोल चौकशी व्हावी. सखोल चौकशीनंतर पवार कुटुंबाचा खरा चेहरा जनतेसमोर उघड होईल, असे पडळकर म्हणाले होते. पवार कुटुंब हे संविधानापेक्षा मोठे नाही. आयकर विभाग, ईडी अशा तपास संस्थांनी त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी नुकतीच केली होती. शरद पवारांना लोक किंमत देत नाहीत, त्यांच्यामागे कोणताही जनाधार नाही, अशी मुक्ताफळेही त्यांनी उधळली होती. दरम्यान, राष्ट्रवादीने मात्र याची दखलही घेतली नव्हती.