मुंबई : कोरोना काळात बंद झालेली कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस ( Sayadri Express ) आता पुन्हा धावणार आहे. गेल्या दोन वर्षापासून ही एक्सप्रेस बंद होती. मुंबईतून धावणारी ही एक्सप्रेस सध्या पुण्यातून धावणार आहे. सीएसटी स्थानकावर प्लॅटफॉमचे काम सुरु असल्याने ती पुण्यातून धावणार आहे. ५ नोव्हेंबरपासून कोल्हापूर ते पुणे ती धावणार आहे. ६ नोव्हेंबर ते १ जानेवारी २०२४ पर्यंत ही एक्सप्रेस धावणार आहे. पण मुंबईतून ती धावणार नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई ते कोल्हापूर दरम्यान या एक्सप्रेसने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. पण गेल्या २ वर्षापासून एक्सप्रेस बंद असल्याने महालक्ष्मी एक्सप्रेसला मोठी गर्दी होत होती. तिकीट मिळणे ही अवघड झाले होते. त्यामुळे सह्याद्री एक्सप्रेस सुरु करण्याची मागणी होत होती. सह्याद्री एक्सप्रेस पुण्यापासून सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय.
दररोज रात्री ११ : ३० वाजता ही रेल्वे राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्थानकावरून सुटेल. जी सकाळी ७ : ४५ वाजता पुण्यात पोहचेल. तर पुण्यातून रोज रात्री ९: ४५ वाजता सुटेल आणि कोल्हापुरात पहाटे ५ : ४० वाजता पोहचणार आहे.
सीएसटी स्थानकावर प्लॅटफॉमचे काम पूर्ण झाल्यानंतर ही एक्सप्रेस मुंबईपर्यंत धावेल अशी शक्यता आहे. पण सध्या तरी नवीन वर्षापर्यंत ती पुण्यापर्यंतच धावणार आहे.