पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या (Pimpri Chinchwad) विकासात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या टाटा मोटर्समध्ये कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात नुकताच 2022 ते 2026 या चार वर्षे कालावधीसाठी दीर्घकालीन वेतन करार झाला आहे. त्यानुसार कामगारांना 16 हजार 800 रुपयांची वाढ झाली आहे. या कारारानंतर कामगारांनी कंपनीमध्ये जोरदार जल्लोष केला आहे. तर दुसरीकडे काही कामगारांनी मात्र तीन ऐवजी चार वर्षांचा करार करण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. दरम्यान, अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya) आणि ईदच्या पार्श्वभूमीवर ही वेतनवाढ झाली आहे. या करारानुसार कामगारांना 16 हजार 800 रुपये वाढ मिळणार आहे. या कार्यक्रमाला टाटा मोटर्सचे (Tata Motors) वरिष्ठ अधिकारी, युनियन पदाधिकारी, प्रतिनिधी आणि कर्मचारी उपस्थित होते. उत्पादनक्षमतेचे मापन म्हणून ‘एचपीईव्ही’ या जागतिक परिमाणावर, गुणवत्तेचे मापन – डीआरआर आणि सक्रिय सुरक्षा मापदंड याच्यावर आधारित ”व्हेरिएबल पे” योजना जाहीर करण्यात आली.
ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष ए. बी. लाल म्हणाले, की मी व्यवस्थापन आणि युनियन या दोन्ही कमिटीचे दीर्घकालीन वेतनविषयक करार वेळेवर आणि सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करतो. या करारामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मी पुणे प्लांटला सर्वतोपरी यश चिंततो आणि अनेक वर्षांपासून निर्माण झालेले परस्पर सहकार्य आणि विश्वासाचे संबंध दृढ करण्यासाठी दोघांनाही शुभेच्छा देतो.
युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे म्हणाले, की हा वेतनविषयक करार सर्वांसाठी आशादायी आहे. युनियन आणि कामगार खूप आनंदी आहेत. टाटा मोटर्सचे नेतृत्वाचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी दोघेही कठोर परिश्रमाचे योगदान सतत सुरू ठेवतील.