पुणे: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 16 तारखेला कोल्हापुरातून मोर्चाची हाक दिल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना जाहीरपणे भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा, असे संभाजीराजे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता राज्यातील मराठा आमदार आणि खासदार मराठा आरक्षणासंदर्भात काही निर्णायक भूमिका घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Sambhajiraje Chhatrapati ask Maratha leaders to speak up for Reservation)
काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी नाशिकच्या पत्रकारपरिषदेत मराठा लोकप्रतिनिधींना इशारा दिला होता. मराठा आरक्षणासंदर्भात मी भूमिका मांडल्यानंतर राठा आमदार आणि खासदारांनी माझं-तुझं केलं तर बघा, असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला होता. त्यामुळे आता संभाजीराजे यांच्या फेसबुक पोस्टमुळे मराठा लोकप्रतिनिधींवरील दबाव वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संभाजीराजे छत्रपती मराठा मोर्चा काढण्यात चालढकल करत असतील तर ती गोष्ट ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे. मात्र, यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान होईल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. संभाजीराजे यांनी चालढकल केली तर भाजप जो कोणी मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी पुढाकार घेईल, त्याच्या पाठिशी उभा राहील, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
ते शुक्रवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांना संभाजीराजे राज्य सरकारला वेळ देत आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, मराठा मोर्चा काढण्यात चालढकल झाली तर ती बाब ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे. त्यानंतर मराठा आंदोलनाचं नेतृत्व दुसऱ्या कोणाकडे जाईल किंवा काय होईल, ते माहिती नाही. मात्र, वेळ निघून गेल्यास मराठा समाजाचे मोठे नुकसान होईल. संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेमुळे सरकारला आरक्षणाच्या प्रश्नापासून पळवाट काढण्याची संधी तर मिळणार नाही ना, याचा विचार संभाजीराजे यांनी केला पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
संबंधित बातम्या:
‘संभाजीराजेंनी मोर्चा काढण्यात चालढकल केली तर मराठा समाजाचं नुकसान, सरकारला पळवाट देऊ नका’
तर संभाजी महाराज आडवा येईल, छत्रपती संभाजीराजेंची गर्जना, आमदार-खासदारांनी माघार घेतली तर बघाच
(Sambhajiraje Chhatrapati ask Maratha leaders to speak up for Reservation)