नक्कल, खिल्ली आणि प्रत्युत्तर, पुण्यात राजकारण तापलं, अजित पवार VS संग्राम थोपटे वाकयुद्ध रंगलं

| Updated on: Nov 11, 2024 | 3:35 PM

महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुळशीत जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांची मिमिक्री करून आमदाराच्या अंगात पाणी असावे लागते असे विधान केले.

नक्कल, खिल्ली आणि प्रत्युत्तर, पुण्यात राजकारण तापलं, अजित पवार VS संग्राम थोपटे वाकयुद्ध रंगलं
Follow us on

भोर-रायगड-मुळशी विधानसभेचा संघर्ष प्रचारातून उफाळून आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुळशीतील प्रचार सभेत विद्यमान आमदार संग्राम थोपटेंवर मिमिक्री करत टीकास्त्र सोडले. यानंतर मुळशीत आज विद्यमान आमदार संग्राम थोपटे प्रचार करत असून सभेतून ते अजित पवार यांचे नाव न घेता टीकेला उत्तर देत आहेत. पवार आधी टीका करतात, नंतर पश्चाताप करतात, असा टोला थोपटे यांनी लगावला. आम्ही सुसंस्कृत आहोत. प्रचाराच्या सांगता सभेत अजित पवारांच्या टीकेला समाचार घेतला जाईल, असेही संग्राम थोपटे म्हणाले.

महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुळशीत जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांची मिमिक्री करून आमदाराच्या अंगात पाणी असावे लागते असे विधान केले. भोरचे एसटी स्टँड आहे की पिकअप शेड? माझ्या बारामतीत येऊन पाहा, असं म्हणत अजित पवार यांनी संग्राम थोपटेंची नक्कल केली होती. त्यावर संग्राम थोपटेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संग्राम थोपटे यांचं सोशल मीडियावर प्रत्युत्तर

अजित पवारांच्या टीकेला आमदार संग्राम थोपटे यांनी सोशल मीडियावर उत्तर दिले आहे. “जसजशी निवडणूक जवळ येत जाईल तसतसे भोर तालुक्यात नेत्यांच्या फेऱ्या वाढणार आहेत. या नेत्यांनी कायमस्वरूपी भोर तालुक्याचे पाणी पळवल्याचा प्रयत्न केला असून माझ्याबद्दल मुळशीत नेत्यांनी माझ्या अंगात पाणी नाही अशी टीका टिप्पणी केली. पण त्या नेत्यांना मला आवर्जून सांगायचे आहे की, माझ्या अंगात किती पाणी आहे हे आपणाला लोकसभेच्या निवडणुकीत दाखवले आहे आणि येणाऱ्या विधानसभेलाही भोरची आणि या मतदारसंघातील जनता तुम्हाला चांगल्या पद्धतीचे पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही”, असं संग्राम थोपटे म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता केवळ 8 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. या प्रचारसभांमधून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडत आहेत. प्रत्येकाकडून जनतेला आपल्याला मतदान करावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यांना यश मिळतं का ते पुढच्या 12 दिवसांनी स्पष्ट होणार आहे. पण हे 12 दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत. या 12 दिवसांत कोणता पक्ष बाजी मारतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.