‘नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला, त्याच्याकडून जमेना म्हणून बारामतीचा…’, संजय राऊतांची बोचरी कविता

| Updated on: Mar 09, 2024 | 8:05 PM

महाविकास आघाडीची आज पुण्याच्या भोर तालुक्यातील हरीशचंद्री येथे सभा पार पडली. या सभेत त्यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली. विशेष म्हणजे राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करणारी एक बोचऱ्या शब्दांतली कविता सादर केली.

नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला, त्याच्याकडून जमेना म्हणून बारामतीचा..., संजय राऊतांची बोचरी कविता
Follow us on

पुणे | 9 मार्च 2024 : “विकासाच्या नावाखाली लोक सोडून गेले. कशाला जातो रे तू? विकास करायला जातो. भारतीय जनता पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विकास पुरुष, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विकासाची कितीतरी महान दृष्टी, पण विकास करायला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेची, काँग्रेसची माणसं लागतात. मला त्यादिवशी फार सुंदर कविता वाचण्यात आली. ती अशी… नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला, त्याच्याकडून जमेना म्हणून बारामतीचा बघितला, तो पुरे ना म्हणून नांदेडवाल्याचा हात धरला, बघू आता तरी कमळाबाईच्या पोटी विकास पैदा होता का”, अशी बोचरी कविता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सादर केली. महाविकास आघाडीची आज भोर तालुक्यातील हरीशचंद्री येथे सभा पार पडली. या सभेत त्यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली.

“अरे स्वत:ला होत नाही. अरे विकास कुठे आहे? म्हणून हे तीन-तीन बाहेरचे नवरे केले. त्यांच्याकडून सुद्धा होणार नाही. काँग्रेसने गेल्या 70 वर्षात या देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास केला. पण यांना वाटतं हा देश 2014 मध्ये निर्माण झाला. त्याआधी हा देशच नव्हता, शरद पवार नव्हते, यशवंतराव चव्हाण नव्हते, बाळासाहेब ठाकरे नव्हते, पंडित जवाहरलाल नेहरु नव्हते, सरदार वल्लभाई पटेल नव्हते, देशच नव्हता. लाल किल्ला सुद्धा मोदींनी बांधला. गेट वे ऑफ इंडिया, इंडिया गेट मोदींनी बांधला. रिझर्व्ह बँक मोदींनी बांधली, मग त्या बँकेतले पैसे पळवायला अमित शाह यांना आणलं. हा यांचा विकास. तुम्ही काय विकास केलात? एक नंबरचे ढोंगी आणि खोटारडे आहात”, असा घणाघात संजय राऊतांनी केला.

‘मोदींना जलद गतीने फेकाफेक करणारा माणूस म्हणून भारतरत्न द्या’

“या सरकारने, मोदीने गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या जणांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे, पण मला एक स्पेशल भारतरत्न मोदींना द्यायचा आहे. त्यासाठी मी शरद पवारांची परवानगी घेईन. इतक्या जलद गतीने फेकाफेक करणारा माणूस या जगात दुसरा जन्माला आला नाही. तो भारतात जन्माला आला, तो भारतीय जनता पक्षात जन्माला आला. या लोकांना कसंकाय सूचतं? कुठे ट्रेनिंग मिळते? यांची कुठे कार्यशाळा आहे?”, असा सवाल राऊतांनी केला.

“नरेंद्र मोदी काल कलकत्त्यात गेले आणि म्हणाले मी लहान असताना…. यांना लहानपणाचं फार आठवतं अजून.. मी लहान असताना मला कलकत्यातल्या मेट्रो ट्रेन विषयी फार आकर्षण वाटायचं. मोदींचा जन्म 1950 साली झाला. कोलकत्तात मेट्रो ट्रेन 1985 साली. तेव्हा हा व्यक्ती 36 वर्षांचा होता. 36 वर्षाच्या व्यक्तीला वाटतं मी लहान आहे. त्यामुळे मला असं वाटतं एक स्पेशल भारतरत्न यांना द्यायला हवा”, अशी टीका संजय राऊतांनी केली.

‘कपिल देवला बॉल कसा घासायचं हे जय शाहने शिकवलं’

“जलद गतीने फेकाफेक करणारी व्यक्ती म्हणून. किंवा या फेकाफेकीचा खेळ म्हणून ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करावा, त्या खेळाचं कोच म्हणून नरेंद्र मोदी यांची नेमणूक करावी, असा प्रस्ताव आमचा शरद पवार यांच्याकडे आहे. कारण त्यांचा खेळाशी संबंध आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचाही खेळाशी संबंध आहे. हातामध्ये बॅट न धरता जय शाह बीसीसीआयचा अध्यक्ष बनला. मला कुणीतरी विचारलं की, जय शाह आणि क्रिकेटचा संबंध काय? मी म्हटलं सुनील गावस्कर यांना जय शाह यांनी शिकवलं. कपिल देवला बॉलिंग, बॉल कसा घासायचं हे जय शाह यांनी शिकवलं. विरेंद्र सेहवागला सिक्स मारता येत नव्हता. ते जय शाहने शिकवलं. त्यामुळे जय शाह भारतीय क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष आहे”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.