Sanjay Raut : ‘त्या’ 16 आमदारांची राजकीय तिरडी बांधली, फक्त हे राम म्हणायच बाकी; संजय राऊत यांचा खोचक हल्लाबोल

| Updated on: Sep 21, 2023 | 10:08 AM

राज्यातील सत्तासंघर्षावर येत्या दोन आठवड्यात चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात प्रचंड ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आता गती मिळण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut : त्या 16 आमदारांची राजकीय तिरडी बांधली, फक्त हे राम म्हणायच बाकी; संजय राऊत यांचा खोचक हल्लाबोल
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे | 21 सप्टेंबर 2023 : राज्यातील शिवसेनेच्या फुटीर 16 आमदारांचा निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना या आमदारांबाबत निर्णय घेण्याची डेडलाईन दिली आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणात वेळकाढूपणा केल्याचेही ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे येत्या दोन आठवड्यात या प्रकरणावर मोठी बातमी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. राऊत यांनी या प्रकरणावरून शिंदे गटावर पुन्हा एकदा जहरी टीका केली आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांचे 16 आमदार अपात्र ठरतील. त्याबाबत कुणाच्या मनात शंका असण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांची राजकीय तिरडी बांधली आहे. फक्त हे राम म्हणायचं बाकी आहे. हे स्पष्ट सांगतो. मुडद्यात कितीही जान फुंकण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी विज्ञान आणि कायद्याला मर्यादा आहे. विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. नाही तर संसदीय इतिहासात विधानसभा अध्यक्षांचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिलं जाईल हे त्यांनाही माहीत आहे, असं संजय राऊत म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.

फसवणुकीतून तयार झालेलं सरकार

राज्यातील सरकार फसवणुकीतून तयार झालं आहे. पैसे मिळाले असतील पण इतर आश्वासने पूर्ण झाली नाही. दोन्ही पक्षातील 100 टक्के आमदार ईडी, सीबीआय, भीती आणि पैसे या मोहापायी आणि भीतीतून पळाले आहेत, असा दावा राऊत यांनी केला आहे.

वेळकाढूपणा सुरू

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी या मुद्द्यावर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. विधानसभा अध्यक्ष आपला निर्णय द्यायला वेळकाढूपणा करत आहेत. 14 तारखेला त्यांनी पहिली सुनावणी घेतली. पण त्यामध्ये सुद्धा ही घटनात्मक दर्जाची, घटनात्मक नियमांची आणि घटनात्मक अधिकाराची पायमल्ली अध्यक्ष करत आहेत. याची जाणीवही अध्यक्षांना राहिलेली नाही, असं भास्कर जाधव म्हणाले होते. सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांबद्दल अतिशय कठोर शब्दांमध्येच ताशेरे ओढले आहे. हे अध्यक्षपदासाठी योग्य नाहीस, असंही ते म्हणाले होते.

निकाल आमच्या बाजूनेच लागणार

भाजपने सध्या स्वायत्त संस्थांचे अधिकार आपल्या स्वतःच्या पक्षाच्या राजकारणाकरता वापरले आहेत. संविधान कमकुवत करण्याचे उद्योग भाजपने केले आहेत. तर विधानसभा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या तालावर नाचत आहेतस असं सांगतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूनेच निकाल लागणार आहे, असंही जाधव यांनी स्पष्ट केलं.