पुणे-कोल्हापूरमध्ये वाद पेटण्याची चिन्ह, काय आहे कारण?

| Updated on: Jun 20, 2023 | 12:00 PM

Pune and Kolhapur News : पुणे अन् कोल्हापूर जिल्ह्यात वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. एका कार्यालयामुळे हा वाद निर्माण होणार आहे. हे कार्यालय कोल्हापूरवरुन पुण्यात स्थालांतरीत करण्यास विरोध होत आहे.

पुणे-कोल्हापूरमध्ये वाद पेटण्याची चिन्ह, काय आहे कारण?
Follow us on

भूषण पाटील, कोल्हापूर : कोल्हापुरात गेल्या अनेक वर्षापासून पोलीस आयुक्तालयाची मागणी होत आहे. परंतु त्याची अद्याप पूर्तता झालेली नाही. या परिस्थितीत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय पुण्याला स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यावरून राजकारण तापले आहे. कोल्हापुरात आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी होत असताना, त्याकडे दुर्लक्ष करत हे कार्यालयच हलवण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. हे कार्यालय हलवल्यानंतर कोल्हापुरात गुन्हेगारी फोफावण्याची भीती आहे. कोल्हापूरचे महत्व कमी करण्याचा सुद्धा हा प्रयत्न असल्याचा आरोप माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी केला.

महाविकास आघाडी सरकारने दिले होते आश्वासन

कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास 40 लाखाच्या आसपास आहे. यामुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यासाठी आयुक्तालय असणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही वेळोवेळी शासन स्तरावर पाठपुरावा केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापुरात पोलीस आयुक्तालय व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोल्हापुरात पोलीस आयुक्तालय होण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेतली होती. तसेच कोल्हापुरातून विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय स्थलांतरित होणार नाही अशी ग्वाही सुद्धा महाविकास आघाडी सरकारने दिली होती, असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

…तर गुन्ह्यांचे प्रमाण वाढणार

सध्या पोलीस आयुक्तालय तर नाहीच पण विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय पुण्याला स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हे कार्यालय पुण्याला हलवल्यास कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस मनुष्यबळांची प्रचंड कमतरता भासणार आहे. गेल्या काही दिवसात कोल्हापूर परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. माफियाराज फोफावत आहे. संघटित गुन्हेगारी, सावकारी, दरोडे, महिलांवरील अत्याचार अशा गुन्ह्यांचा आलेख वाढतच आहे. या गुन्ह्यांना पायबंध घालने आवश्यक आहे. पोलीस आयुक्तालय किंवा विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय असेल तरच अशा गुन्हांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

हे सुद्धा वाचा

काय म्हणतात सतेज पाटील

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यापार उद्योग व्यवसाय याच्या दृष्टिकोनातून कोल्हापूर महत्त्वाचे केंद्र आहे. यामुळेच पाच जिल्ह्यासाठी कोल्हापुरात विशेष पोलीस महानिरीक्षकांचे कार्यालय आहे. हे कार्यालय स्थलांतरित करून कोल्हापूरचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोल्हापुरातील कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विशेष पोलीस महानिरीक्षकांचे कार्यालय कोल्हापुरातून स्थलांतरित करण्यास आमचा ठाम विरोध आहे. सध्याच्या सरकारचा हे कार्यालय स्थलांतरित करण्याचा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.