पुणे : पुणे (Pune) शहर आणि जिल्ह्यात कोरोनाच्या लसीच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येत आहे. अनियमित लसीकरणामुळे (Corona Vaccination) शहरात दुसरा डोस घेण्यासाठी लस अपुरी पडत आहे. त्यामुळे दुसऱ्या डोस घेणाऱ्यांसाठी महापालिकेने कोविशिल्ड (Covishield) आणि कोवॅक्सिन (Covaxin) या लसींचा 70 टक्के कोटा राखीव ठेवला आहे. आज पुण्यात 188 ठिकाणी कोविशिल्ड तर 7 ठिकाणी कोवॅक्सिन लसीचं लसीकरण केलं जाणार आहे. (second dose of corona vaccine is preferred and 70 per cent vaccine is reserved for it in Pune)
महापालिकेला गुरूवारी 66 हजार कोविशिल्ड आणि 6 हजार 200 कोवॅक्सिनचे डोस मिळाले होते. त्याद्वारे शुक्रवारी 195 लसीकरण केंद्रांवर लसीकरण पार पडलं. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही 195 केंद्रांवर लसीकरण होणार आहे.
कोविशिल्डच्या पहिल्या डोससाठी 15 टक्के लस ऑनलाईन बुकिंगद्वारे उपलब्ध असेल तर 15 टक्के लस थेट केंद्रावर उपलब्ध असेल. पहिला डोस घेतलेल्यांच्या दुसऱ्या डोससाठी 35 टक्के लस ऑनलाई उपलब्ध असेल तर 35 टक्के लस थेट केंद्रावर मिळेल. असंच लसींचं प्रमाण कोवॅक्सिनलाही लागू आहे.
जिल्ह्यात पहिल्या डोस आधी दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यात लसीकरणाचा वेग समाधानकारक आहे. जवळपास कोव्हिड लसीकरणाचा 70 लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. जास्तीत जास्त लस उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. खासगी रुग्णालय लसीकरणावरही शासनाचे नियंत्रण आहे. तसेच खासगी रुग्णालयाच्या वैद्यकीय देयकांचे लेखा परिक्षणही वेळोवेळी सुरु आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी चाचण्यांचे प्रमाण कमी केलेले नाही.
ग्रामीण भागात धडक सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत 2 लाख 83 हजार 327 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. ग्रामीण कार्यक्षेत्रातील हॉटस्पॉट गावांमध्ये कोव्हिड-19 बाबत जनजागृती, शोध चाचणी उपचार, कोव्हिड केअर सेंटर, शासकीय योजना व कोव्हिड लसीकरण या पाच कृतीदलाच्या माध्यमातून कोव्हिडमुक्त गाव अभियानास सुरुवात करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली आहे. तसेच टास्क फोर्सच्या मार्गदर्शनानुसारच शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :