रणजित जाधव, Tv9 मराठी, पुणे | 8 डिसेंबर 2023 : पुण्यातील पिंपरी चिंचवड शहर आगीच्या घटनेमुळे हादरलं आहे. पिंपरी चिंचवडच्या तळवडे भागात एका गोदामाला भीषण आग लागली. या आगीत अनेक जण होरपळले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं? कशामुळे घडलं? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस आणि इतर तपास यंत्रणांनी तपासाला सुरुवात केली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या गोदामात आगीची घटना घडली ते फटाक्याचं गोदाम होतं. या गोदामाला परवानगी नव्हती. ते अनधिकृत होतं. ते गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होतं. अखेर आगीच्या घटनेनंतर गोदामाची माहिती सर्वश्रूत झालीय. आता या प्रकरणी काय कारवाई होते, तसेच मृतकांच्या कुटुंबियांना काही मदत केली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडच्या तळवडे भागात फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीमुळे एकच खळबळ उडाली. आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केलं. त्यामुळे गोदामातील कर्मचाऱ्यांना बाहेर पडता आलं नाही. अनेक कामगार आगीत होरपळले. अतिशय हृदयद्रावक अशी ही घटना आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरीकही सैरभैर झाले आहेत. हे काय घडलं आणि कसं घडलं? याचं उत्तर कुणाकडेच नाही.
आग भडकल्यानंतर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. पण तोपर्यंत बराच उशिर झाला होता. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं. पण आगीत होरपळलेल्या 7 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं नाही. अजूनही काही कामगार आत अडकल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून या कामगारांचा शोध सुरु आहे.
घटनास्थळी अग्मिशमन दलाच्या गाड्यांसह सात ते आठ रुग्णवाहिका दाखल आहेत. जखमींना तातडीने उपचार मिळावा यासाठी रुग्णवाहिका घटनास्थळी आहेत. आतापर्यंत सात मृतदेह काढण्यात आले आहेत. प्रशासनाकडून आणखी कामगारांचा शोध सुरु आहे. दरम्यान, आगीपासून बचाव व्हावा यासाठी कोणतीही यंत्रणा गोदामात नव्हती का? हे गोदाम बेकायदेशीरपणे कसे सुरु होते? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणातील दोषींवर योग्य कारवाई होते का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.