बारामती: बारामती जवळच्या गोखळी (Gokhali) येथील स्वरा भागवत (Swara Bhagwat) या सात वर्षाच्या मुलीने महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसुबाई शिखरावर (Kalsubai peak) चढाई केली. 1 तास 56 मिनिटे एवढ्या कमी वेळेत कळसुबाईचे शिखर पार करणारी स्वरा सर्वात लहान मुलगी ठरली आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. स्वरा योगेश भागवत सात वर्षांची असणारी मुलगी व्यायामाचे विविध प्रकार करते. दहा तासात 143 किलोमीटर सलग सायकल चालवल्याने ही स्वरा सोशल मीडियावर चर्चेत आली होती.
त्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरजवळील कठीण असणारा हरिहर गड ट्रेक करून दुसऱ्याच दिवशी स्वरा भागवतने शिवजयंतीच्यानिमित्ताने महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर सर केले. एक तास 56 मिनिटे एवढ्या कमी कालावधीत हा अवघड असलेला ट्रेक पूर्ण केला आहे. स्वराने सायंकाळी 6 वाजता 1 मिनिटांनी शिखर सर करण्यासाठी सुरूवात केली व 7 वाजून 57 मिनिटांनी हे शिखर सर केले. स्वराने वयाच्या 7 व्या वर्षी केलेल्या विक्रमाबद्दल महाराष्ट्राचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तिचा गौरव केला.
कळसुबाई शिखराची उंची ही 1 हजार 46 मीटर आहे. हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. तिच्या या मोहिमेत तिचे वडील योगेश भागवत, अस्लम शेख सहभागी झाले होते. तिने यापूर्वी 10 तासात 143 किलोमीटर सायकलिंग सहाव्या वर्षी विक्रम केला होता तर स्वराच्या 50 प्रकारच्या दोरीवरील उड्या, 1 मिनिटात 100 पुश्यप काढणे आदी विक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ द रेकॉर्ड’ने नोंद घेतली आहे.
अगदी लहान वयात व्यायामाच्या विविध प्रकारचे धडे गिरवणाऱ्या स्वराच्या या यशाने तिच्या आणखी एका विक्रमामध्ये भर पडली आहे. त्यामुळे बारामतीकरांची छाती अभिमानाने फुगल्याशिवाय राहणार नाही.
संबंधित बातम्या
प्रियांका गांधी दुसरी इंदिराच, लडकी हूँ, लड सकती हूँ नारा देशव्यापी-यशोमती ठाकूर
ट्रान्स हार्बर लिंक रोड मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडण्याचा मानस, किती वेळ वाचणार?