पुणे : “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सकाळपासून या अपघाताच्या घटनेकडे लक्ष आहे. आमदारांची प्रकृती कशी आहे याची चिंता त्यांना होती. त्यामुळे ते मला सतत सांगत होते की तू लवकर जा. पण विमानच इथे लँड होऊ शकत नसल्याने मी आमच्या साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की, तुम्ही स्वत: तिथे जा. तुम्ही थांबा. आमचे जिल्हाधिकारी, पुण्याचे जिल्हाधिकारी इथे आहेत. प्रकृतीला लवकर आराम पडावा आणि उपचार चांगले मिळावे यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतलेली आहे”, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा आज पहाटे तीन वाजता भीषण अपघात झाला. त्यांच्यावर सध्या पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. गोरे यांची प्रकृती सध्या स्थिर असून धोक्याच्या बाहेर आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिली. शंभूराज देसाई यांनी रुबी हॉस्पिटलमध्ये जावून जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“जयकुमार गोरे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि धोक्याच्या बाहेर आहे. माझ्याच फोनवरुन आमदार जयकुमार गोरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलले”, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
“मुख्यमंत्र्यांनी सकाळी मला लवकर पुण्याला यायला सांगितलं होतं. पण पुण्याचं विमानतळ सकाळी अकरा वाजेपासून साडेचार वाजेपर्यंत प्रवास वाहतुकीसाठी बंद असतं. त्यामुळे मी साडेचार वाजता विमानतळ उघडल्यानंतर पावणे पाच वाजता आम्ही लँड झालो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनीही आम्हाला तातडीने जा म्हणून सांगितलं होतं”, असंही शंभूराज यांनी सांगितलं.
“जयकुमार यांची प्रकृती चांगली आहे. फलटणमध्ये त्यांना चांगले उपचार मिळाले. रुबी रुग्णालयातही त्यांना चांगले उपचार मिळाले. त्यामुळे ते धोक्याच्या बाहेर आहेत”, अशी माहिती शंभूराज यांनी दिली.
दरम्यान, “जयकुमार गोरे यांच्या घातपाताची शक्यता बिलकूल वाटत नाही. कदाचित बोलण्याच्या ओघाने किंवा अनावधनाने जयकुमार यांचे वडील घातपाताबद्दल बोलले असतील”, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.