पिंपरी चिंचवड : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) भाजपाचा झालेला विजय जगताप कुटुंब आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी अभिमानास्पद असल्याची भावना शंकर जगताप (Shankar Jagtap) यांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यात बोलत होते. शंकर जगताप हे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आहेत. काल राज्यसभेसाठी मतदान पार पडले. यावेळी सुरुवातील लक्ष्मण जगताप मतदान करू शकतील की नाही, विषयी साशंकता होती. मात्र नंतर ते अॅम्ब्युलन्समधून मुंबईत पोहोचले. रात्री भाजपाचा विजय झाल्याचे घोषित झाले. भाजपाचे (BJP) तिन्ही उमेदवार निवडून आले. या विजयाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांना दिले. त्या पार्श्वभूमीवर शंकर जगताप बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आमदार जगताप अॅम्ब्युलन्समधून मुंबईला गेले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. ही बाब आमच्यासाठी सार्थ अभिमानाची आहे, असे विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी विजयानंतर म्हणाले होते. तसेच हा विजय जगतापांना समर्पित करत असल्याचेदेखील नमूद केले होते. त्यावर शंकर जगताप म्हणाले, की हा केवळ लक्ष्मण जगताप यांचा विजय नसून सर्व कायकर्त्यांचा विजय आहे. पक्षाचा प्रथम विचार करून लक्ष्मण जगताप मतदानासाठी गेले. आम्ही त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो, असे शंकर जगताप म्हणाले.
गेली 45 वर्षे ते राजकारण आणि समाजकारणात आहेत. त्यांच्या कामाचा गौरवच फडणवीसांनी केला. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली, हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना चैतन्य देणारे असेल. तसेच पिंपरी चिंडवडे नागरिक, कार्यकर्ते आणि जगताप कुटुंबीय सर्वांसाठीच हा आनंदाचा क्षण आहे, असे शंकर पाटील म्हणाले. दरम्यान, काल लक्ष्मण जगताप अॅम्ब्युलन्समधून मुंबईत मतदानास पोहोचले. पक्षाला आपली गरज आहे, त्यामुळे मतदान करत असल्याचे काल लक्ष्मण जगताप म्हणाले होते. तर पुण्यातीलच कसबा पेठ आमदार मुक्ता टिळक यादेखील कर्करोगाशी झुंज देत असतानाही काल मुंबईत अॅम्ब्युलन्समधून मतदानासाठी आल्या होत्या.