पुणे : संत तुकाराम महाराजांच्या देहू गावात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका कार्यक्रमात अंधश्रद्धेला बळी पडू नका, असं आवाहन केलं. “देवधर्म, पूजा अर्चा या नावाखाली काही वर्गाची फसवणूक होत आहे. फसवणूक करणाऱ्या वर्गाचा मुखवटा समोर आणायला हवा. संतांनी जी शिकवण दिली आहे, ते सामान्य लोकांसमोर मांडायला हवी. त्यामुळे समाजातील कटुता कमी होईल. आज पूजा कोणाची करायची याबाबत आपण चर्चा करतो? तुकोबांनी सांगितलं आहे की, तुम्ही आजूबाजूला असणाऱ्या उपेक्षितांची पूजा अर्चा करा. तेव्हाच तुम्हाला सिद्धी मिळेल. खरा कष्टकरी, सामान्य माणसाला योग्य तो सन्मान द्यायला हवा. हीच शिकवण समाजाला द्यायला हवी. समाजात घडणाऱ्या घटनांना आळा घालायचा असेल तर संतांचे विचार प्रबोधनातून मांडण्याचा वसा हाती घ्यायला हवा”, असं शरद पवार म्हणाले.
“सामान्य माणसाला तुकोबांच्या अभंगाचा अर्थ कळायला हवा, असं मी गाथा परिवार आणि त्यांच्या सोबतीच्या आयोजकांना सांगितलं. ते म्हणाले आम्हाला तीन महिने द्या. या कालावधीत त्यांनी प्रशिक्षण घेत उत्तम प्रकारे मांडणी केली हे आज आपण पाहिलं. आता इथंच थांबायचं नाही, हे अखंडितपणे सुरू ठेवा. त्या दृष्टीने आपली पावलं टाका”, असं शरद पवार म्हणाले.
“शाहू महाराजांचा एकाने उल्लेख केला. त्यांच्या हातातील सत्ता ही जनतेची सत्ता असा नेहमी उल्लेख केला. एकदा कर्नाटकचे ज्ञानी माणूस येत आहेत, असं त्यांना सरदारांनी सांगितलं. त्या ज्ञानी माणसाकडे उद्या काय होणार याची त्यांना कल्पना असते, तेव्हा तुम्ही त्याला भेटाच असा आग्रह सरदारांनी केला. ते ज्ञानी आले अन् म्हणाले मला पोलिसांनी पकडलं आणि मारलं. मग महाराज म्हणाले अरे तू माझं भविष्य सांगणार होता, पण तुलाच तुझी काय अवस्था होणार याची कल्पना नव्हती. मग तू माझ कसं काय भविष्य सांगणार होता? खरं तर तुला अद्दल घडवण्यासाठी मीच पोलिसांना तुझ्यासोबत असं करायला सांगितलं होतं. अशा प्रकारे शाहू महाराजांनी अंधश्रद्धा पसर पितळरवणाऱ्यांचं उघडं केलं. हेच कार्य आपल्याला करायचं आहे. हा वसा हाती घ्या”, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.
शरद पवार यांंचं आवाहन महत्त्वाचं आहे. देशात आजही अनेक ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घातल्या जाणाऱ्या गोष्टी घडताना दिसतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी अनेक सामाजिक संस्था काम करत आहेत. पण जोपर्यंत माणूस स्वत:हून अंधश्रद्धेला थारा देणार नाही तेव्हा देशात बदल घडणार नाही. त्यामुळे संत तुकोबांचे विचारांचा वारसा जपत अंधश्रद्धेला बळी न पडण्याचं आवाहन शरद पवारांनी कार्यक्रमात केलं.