बारामतीच्या प्रचार सभेतून अजित पवारांनी लेकीला निवडून दिलं. आता सूनेला निवडून द्या म्हणत अजित पवारांनी सूनेत्रा पवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. मात्र शरद पवारांनी सूनेत्रा पवारांना त्या बाहेरच्या असल्याचं म्हटलंय. मूळ पवार आणि बाहेरुन आलेल्या पवारांमध्ये फरक असल्याचं पवार म्हणाले आहेत. म्हणजेच सूनेत्रा मूळच्या पवार नाहीत हेच पवारांनी सांगितलं. मूळ पवारांमध्ये फरक आहे असं थेट विधान शरद पवारांनी केलं. सुनेत्रा पवार अजित पवारांच्या पत्नी आहेत. सुनेत्रा पवार मूळच्या धाराशीवच्या तेर गावच्या आहेत. सुनेत्रा पवार मोठ्या राजकीय घराण्यातील आहेत. त्या पद्मसिंह पाटलांच्या बहीण आहेत. सुनेत्रा पवारांचं वडिलांकडून नाव आहे सुनेत्रा बाजीराव पाटील आणि त्यांच्या आई द्रौपदी पाटील आहेत. म्हणजेच आपल्या परंपरेप्रमाणं लग्नानंतर सुनेत्रा पाटील या सुनेत्रा पवार झाल्यात. त्यामुळं अजित पवारांनी सूनेला निवडून द्या म्हणताच, शरद पवारांनी मूळ पवारचा मुद्दा उपस्थित केला.
बारामतीच्या निवडणुकीत पवार कुटुंबात अजित पवार एकटे पडले आहेत. त्यांचे बंधू श्रीनिवास पवारही सुप्रिया सुळेंचा प्रचार करत आहेत. त्यावरुन माझ्या निवडणुकीत भावंडं फिरली नाहीत असं अजित पवार म्हणाले होते. त्या टीकेवरही शरद पवारांनी उत्तर दिलंय. “निवडणूक आल्यानंतर माझ्या कुटुंबातले सगळे लोक प्रचारात उतरतात. माझी निवडणूक असो, अजितची निवडणूक असो किंवा सुप्रियाची निवडणूक असो. आमच्या कुटुंबातले घटक असतात. त्यामुळे अजित पवार जे म्हणाले की त्यांच्या वेळी प्रचाराला कुणी गेलं नाही ते काही खरं नाही. लोकांच्यात जातात, भूमिका मांडतात. लोकांचा सहभाग निवडणुकीत कसा होईल हे पाहतात. माझ्या कुटुंबातले जे घटक आहेत त्यांचे व्यवसाय हे सगळ्यांना माहीत आहेत”, असं उत्तर शरद पवारांनी दिलं.
अजित पवारांच्या टीकेला उत्तर देतानाच प्रफुल्ल पटेलांच्याही दाव्यावरुनही पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवारांनी 2 जुलैला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही शरद पवार सोबत येण्यासाठी 50% तयार झालेच होते, असा दावा प्रफुल्ल पटेलांनी केला. आजची वस्तूस्थिती काय आहे. भाजपसोबत कोण गेलं आहे? असं म्हणत शरद पवारांनी पटेलांचा दावा फेटाळला. शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांचा दावा फेटाळून लावला. पण फडणवीसांनी पटेलांच्या दाव्यात तथ्य असल्याचं म्हटलंय.
आजची वस्तूस्थिती काय, असं सांगत प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यात काहीही तथ्य नाही असं पवार म्हणालेत. आता लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमनेसामने आहेत. त्यातच बारामतीचा सामना कुटुंबातच आहे आणि शरद पवारांनी सुनेत्रा पवार या मूळ पवार नाहीत असं सांगून, प्रचारात नवा मुद्दा आणलाय.